जाणून घ्या जिओच्या मोफत फोनसाठी असणाऱ्या नियम आणि अटी


थोड्याच दिवसांमध्ये लोकांच्या हातात रिलायन्स जिओचा बहुप्रतिक्षित फिचर फोन दिसू लागेल. अनेकांच्या मनात या फोनबद्दल मोठी उत्सुकता आहे. आता या फोनबद्दलच्या अटी आणि नियम समोर आल्या आहेत. दरम्यान रिलायन्सकडून जिओ फोनसाठी ग्राहकांनी मोजलेले पैसे तीन वर्षांनंतर परत मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता रिलायन्सकडून यासाठीच्या अटी समोर आल्या आहेत. या फिचर फोनबद्दलच्या अटींची माहिती रिलायन्सने आपल्या संकेतस्थळावर दिली आहे.

रिलायन्स जिओच्या संकेतस्थळावरील अटींनुसार, प्रत्येक वर्षी कमीतकमी दीड हजारांचा रिचार्ज रिलायन्स जिओ फिचर फोनच्या वापरकर्त्याला करावा लागेल. आधीपासूनच जिओच्या फोनमध्ये सिम कार्ड असेल. हे सिम कार्ड लॉक असेल. वापरकर्त्याला त्यामुळेच या फोनमध्ये दुसऱ्या कोणत्याही कंपनीचे सिम टाकता येणार नाही. कोणालाही ग्राहक फिचर फोन विकू शकत नाही, याचा स्पष्टपणे उल्लेख संकेतस्थळावर करण्यात आला आहे.

जिओकडून १५०० रुपये द्या, तीन वर्षे वापरा आणि १५०० रुपये पर घ्या, अशी जाहिरात करण्यात आली होती. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी याचाच उल्लेख करत जिओ फोन मोफत असेल, असे म्हटले होते. पण ३ वर्षांआधी फोन परत केल्यावर काय होईल, याबद्दलची माहिती त्यांनी दिली नव्हती. जिओने आता ही माहिती संकेतस्थळावर दिली आहे. फोन १२ महिन्यांच्या आधीच ग्राहकाला जर परत करायचा असल्यास, त्याला १५०० रुपये, जीएसटी आणि इतर कर भरावे लागतील. हा फोन एखाद्या ग्राहकाने वर्षभर वापरल्यानंतर तो दोन वर्षे पूर्ण होण्याआधीच परत केल्यास, त्याला जीएसटी, इतर करांसह १००० रुपये द्यावे लागतील. दोन वर्षानंतर आणि तीन वर्षे पूर्ण होण्याआधी फोन परत केल्यास जीएसटी, इतर करांसह ५०० रुपये द्यावे लागतील.

कोणत्याही ग्राहकाकडून अटी आणि नियमांचा भंग केल्यावर फोन परत घेण्याचे अधिकार कंपनीने सुरक्षित ठेवले आहेत. ग्राहकाने तीन वर्षे फोनचा वापर केल्यावर फोन परत करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली जाईल. ग्राहकाने फोन या काळात परत न केल्यास त्याला १५०० रुपये परत केले जाणार नाहीत. तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरच्या तीन महिन्यात फोन परत करणाऱ्या ग्राहकांनाच रक्कम परत केली जाणार आहे.

Leave a Comment