सणासुदीचा हंगाम व्यापाऱ्यांसाठी सुनासुना आणि ग्राहकांसाठीही…


नवी दिल्ली: नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणीसारख्या कठोर निर्णयांच्या परिणामातून भारतीय अर्थव्यवस्था अद्याप सावरलेली नाही. ग्राहकांच्या क्रयशक्तीमध्ये लक्षणीय घट झाल्याने या वर्षीचा दसरा; दिवाळीचा सणासुदीचा खरेदीचा जल्लोषही ओसरणार आहे. परिणामी हा उत्सवी हंगाम ग्राहक आणि व्यापारी या दोघांसाठी सुनासुनाच ठरणार आहे.

दरवर्षी दसरा आणि दिवाळीच्या काळात ग्राहकांमध्ये खरेदी करण्याचा जल्लोष असतो. मुहुर्तावर खरेदी करण्यासारख्या धार्मिक बाबीसह बोनसची मिळणारी जोड ही हा उत्साह द्विगुणित करते. मात्र यावर्षी नोटाबंदी; जीएसटी आणि उद्योग क्षेत्रातील मंदीसदृश परिस्थितीमुळे ग्राहकांची आर्थिक कोंडी झाल्याने या उत्साहावर पाणी पडणार असल्याचे दिसून येते.

‘लोकल सर्कल’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ५२ टक्के नागरिकांनी या सणासुदीसाठी केवळ १० हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची आपली क्षमता असल्याचे सांगितले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी २८ टक्के ग्राहकांनी तर या कालावधीत काहीच खर्च करणार नसल्याचे सांगितले. केवळ १९ टक्के ग्राहक १० ते ३० हजारापर्यंत खर्च करणार आहेत. या १९ टक्के लोकांवरच व्यापाऱ्यांच्या व्यवसायाची मदार असणार आहे.

दसरा दिवाळीच काय; या वर्षभरात मोठी खरेदी करण्याची शक्यता आता तरी वाटत नसल्याचे ५५ टक्के लोकांनी सांगितले.

सध्याच्या काळात कुटुंबातील एखाद्याची नोकरी गेलेली आहे. नवयुवकांना नोकरी मिळणे मुष्कील आहे. ज्यांना नोकरी आहे; त्यांना बोनस; पगारवाढ तर दूरच; नियमित वेतन पूर्ण आणि वेळेवर मिळाले तरी पुष्कळ! स्वतंत्र उद्योग; व्यवसाय करणाऱ्यांची अवस्था तर अधिकच बिकट झाल्याचे या सर्वेक्षणाचा अहवाल सांगतो.

Leave a Comment