व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतर काय खावे?


अन्न हे आपल्या शरीराचे इंधन आहे. हे इंधन योग्य प्रमाणात मिळाल्याशिवाय शरीराची गाडी सुरळीत चालू शकत नाही. व्यायाम कुठल्याही प्रकारचा असो, त्याला योग्य आहाराची जोड मिळाली नाही तर आपण करीत असलेल्या व्यायामाचे आपल्या मनासारखे परिणाम आपल्या शरीरावर होत नाहीत. त्यामुळे व्यायामाच्या पूर्वी आणि व्यायामानंतरचा आपला आहार काय असावा हे काळजीपूर्वक ठरविणे गरजेचे आहे.

व्यायाम सुरू करण्यापूर्वी आणि व्यायामानंतर शक्यतो कॉम्प्लेक्स कर्बोदकांचे सेवन करावे, असे सुप्रसिद्ध फिटनेस तज्ञ लीना मोगरे म्हणतात. या आहारामुळे आपल्या शरीराला किमान दोनशे कॅलरीज मिळणे आवश्यक आहे असे तज्ञांचे मत आहे. व्यायामापूर्वीच्या आहारामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असणारा आहार घ्यावा आणि व्यायामानंतरच्या आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असावयास हवे.

व्यायामापूर्वीचा आहार अतिशय महत्वाचा असतो. हा आहार व्यायामापूर्वी पंधरा ते वीस मिनिटे आधी सेवन करावा. रिकाम्यापोटी व्यायाम करणे टाळावे कारण व्यायामासाठी आवश्यक उर्जा शरीरामध्ये अन्नाशिवाय येऊ शकत नाही. त्यामुळे व्यायामापूर्वी केळे किंवा उकडलेला बटाटा या सारख्या पदार्थांचे सेवन करावे. या स्वरूपामध्ये आपल्या शरीराला मिळत असेलेली कॉम्प्लेक्स कर्बोदके आपल्या शरीरामध्ये पुष्कळ काळाकरिता हळूहळू उर्जा निर्माण करीत राहतात. त्यामुले व्यायामासाठी आवश्यक उर्जा सातत्याने शरीरामध्ये तयार होत राहते. एखाद्या व्यक्तीला जेवणाच्या शिवाय अधेमध्ये काहीही न खाण्याची सवय असते. अश्या वेळी व्यायामाच्या किमान दोन तास आधी भोजन करून घेणे योग्य असते. त्यामुळे अन्न व्यवस्थित पचविण्यासाठी शरीराला पुरेसा अवधी मिळतो.

आपण कमी इंटेंसिटी ( तीव्रता ) किंवा कमी शारीरिक श्रम आवश्यक असलेला व्यायाम करणार असाल तर अंडे, टोस्ट, ओटमील, अश्या प्रकारचा नाश्ता व्यायामापूर्वी घ्यावा. जर आपण मध्यम इंटेंसिटी चा व्यायाम करणार असाल, तर ताजी फळे आणि त्यासोबत ओट्स, ताज्या भाज्या चिरून घालून केलेले अंड्याचे ऑमलेट, अश्या प्रकारचा नाश्ता घ्यावा. आपण करीत असेलेला व्यायाम जर अतिशय तीव्र इंटेंसिटीचा असेल तर व्यायामापूर्वीच्या नाश्त्यामध्ये पास्ता, फळे, दही , प्रोटीन पावडर घालून दूध अश्या प्रकारचा नाश्ता घ्यावा.

व्यायामापूर्वीच्या नाश्त्याप्रमाणेच व्यायामानंतरचा नाश्ताही अतिशय आवश्यक असतो. व्यायामानंतर आपल्या शरीरातील स्नायूंची खूपच ओढाताण झालेली असते. त्या स्नायूंना पुन्हा ताकद मिळण्यासाठी व्यायाम संपविल्यानंतरच्या एका तासामध्ये नाश्ता करणे आवश्यक असते. व्यायामामुळे शरीरातील खर्च झालेली उर्जा भरून निघण्यासाठी चांगल्या दर्जाच्या प्रथिनांची गरज असते. आपल्या शरीरामध्ये असलेले ग्लायकोजेन आपल्या शरीराला उर्जा देण्याचे काम करीत असते. कर्बोदके, प्रथिने, फॅट्स यांचे योग्य संतुलन असलेला आहार घेतल्याने शरीरामध्ये ग्लायकोजेनचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.

आपण कंमी इंटेंसिटीचा व्यायाम केल्यास त्यानंतर ताज्या भाज्यांचे सॅलड, पीनट बटर, सफरचंदे सूर्यफुलाच्या बिया या पदार्थांचा आपल्या नाश्त्यात समावेश करावा. मध्यम इंटेंसिटीचा व्यायाम केला असल्यास त्यानंतर टोफू, किन्वा, ताज्या भाज्या, रताळी, या पदार्थांचा आपल्या नाश्त्यात समावेश करावा. अतिशय जास्त इंटेंसिटीचा व्यायाम आपण केला असल्यास अंडी, ब्रोकोली, चिकन, बटाटे, मासे, इत्यादी पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा.