अवघ्या काही वर्षात नष्ट होतील ही ठिकाणे


आपल्या जगामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते. या अतिशय सुंदर, निसर्गरम्य ठिकाणांपैकी काही ठिकाणे अशी आहेत, जी हळूहळू काळाच्या पडद्याआड गडप होत चालली आहेत. असे घडण्यामागे अनेक कारणे आहेत. ग्लोबल वॉर्मिंग, हवामानात सातत्याने होणारे बदल, पर्यावरणाचे होत असणारे नुकसान अश्या कितीतरी कारणांमुळे आजपर्यंत अस्तित्वात असलेली काही ठिकाणे आता कायमची दृष्टीआड होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सेशेल्स हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. हिंद महासागरामध्ये मॅडगॅस्करच्या किनारपट्टीच्या जवळ असणारा सेशेल्सचा द्वीपसमूह, नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे सेशेल्स आसपासच्या पाण्याची पातळी सतत वाढत असून, ही द्वीपे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत असल्याने या द्वीपांवरची जमीन हळूहळू पाण्याखाली जात असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. साधारण येत्या साठ ते ऐंशी वर्षांच्या कालावधीमध्ये ही द्वीपे संपूर्णपणे पाण्याखाली जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ऑस्ट्रेलिया येथील ग्रेट बॅरियर रीफ अनेक प्रजातीच्या समुद्री जीवांचे घर आहे. अनेक प्रजातींचे मासे, शार्क्स, डॉल्फिन्सचे येथे वास्तव्य आहे. पण मानवी अतिक्रमण प्रमाणाबाहेर वाढल्याने येथील समुद्री जीवनाला धोका निर्माण झाला आहे. जर यावर आताच नियंत्रण ठेवले गेले नाही, तर पुढील तीस वर्षांच्या कालावधीत या रीफची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. येथील समुद्राच्या तळाशी असलेले कोरल फार मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहेत. तसेच मासेमारीमुळे अनेक माशांच्या प्रजाती संपूर्णपणे नाहीशा होण्याच्या मार्गावर आहेत.

ग्रेट वॉल ऑफ चायना हे जगामधील आश्चर्यांपैकी एक असून या भिंतीचा एक तृतीयांश भाग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शत्रूपासून संरक्षण मिळविण्याच्या हेतुने ही वॉल बांधली गेली होती. एके काळी, कधीही न तोडता येणारी भिंत’ असा हिचा लौकिक होता. पण आता तेथील रहिवाशांनी घरे बांधण्याकरिता या भिंतीतील विटा, दगड काढून नेल्यामुळे ही भिंत आता कमकुवत झाली आहे. चायनीज प्रशासनाने, ग्रेट वॉलच्या विटा चोरणाऱ्यांना दंड केला जाणार असल्याचे सांगूनही येथील विटांची चोरी थांबलेली नाही. तज्ञांच्या मते, अजून साधारण वीस वर्षांच्या कालावधीत या भिंतीचा पश्चिमोत्तर भाग पूर्णपणे नाहीसा होईल.

अलास्कामधील टुंड्रा प्रदेश सदैव बर्फाच्छादित असतो. पण ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या प्रभावामुळे येथील बर्फ आता वेगाने वितळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथील थंड प्रदेशांत राहणारे अनेक जीव आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. किवालीना हे अलास्का मधील लहानसे गाव पुढील दहा वर्षांमध्ये पाण्याखाली जाणार असल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. पुढील शंभर वर्षांमध्ये अलास्का येथील टुंड्रा प्रदेशाचा संपूर्ण नाश होईल असे वैज्ञानिकांचे मत आहे.

Leave a Comment