वेदसंपन्न, विद्वान होता रावण


देशभरात सध्या नवरात्राची धूम सुरू आहे त्याचबरेाबर उत्तरप्रदेशासह अनेक राज्यात रामलिला साजरी होत आहे. रामलिलेत शेवटच्या दिवशी म्हणजे दसर्‍च्या दिवशी रावणदहनाचा मोठा कार्यक्रम साजरा होतो. दिल्लीत रामलिला मैदानावर हा कार्यक्रम होतो आणि त्याचा आनंद लुटायला हजारो प्रेक्षक उपस्थित असतात.


दुष्टांवर सुष्टांचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. पण रावण खरोखरच दुष्ट होता का किंवा खरोखरच त्याला दहा तोंडे हती का याबाबत मात्र विद्वानांच्यात एकमत नाही. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार रावण दशानन नव्हता मात्र तो तसा भ्रम उत्पन्न करत असे. कांही जणांच्या मते तो सहा दर्शने व चार वेदांत पारंगत होता व त्या अर्थाने त्याला दशकंठी म्हणत असत. दशकंठीचा अर्थ दशानन असा घेतला गेला असावा. जैन शास्त्रानुसार रावणाच्या गळ्यात मोठमोठ्या नऊ मण्यांची माळ असे व त्यात त्याच्या मस्तकाचे प्रतिबिंब दिसत असे त्यामुळे त्याला दहा तोंडे असल्याचा भास हेात असे.


एका कथेनुसार रावण मोठा शिवभक्त होताच पण त्याने कठोर तपश्चर्यने नऊ नक्षत्रे त्याच्या अमलाखाली आणली होती. त्याचा मुलगा मेघनाद अमर व्हावा असा त्यामागे त्याचा हेतू होता. पण शनीग्रहाने त्याची चाल बदलली तेव्हा रावणाने शनीला बंदी बनविले इतका तो पॉवरफुल होता.रावण संगीताचा ज्ञानी होता. तो रूद्रवीणा वाजवित असे. त्याला या वादनात कुणीच हरवू शकत नसे. तो मनाने अस्वस्थ असेल तेव्हा रूद्रवीणा वाजवित असे. त्याने व्हायोलिन सारखे वाद्य तयार केले होते त्याला रावणहथारा असे म्हटले जाते. हे वाद्य आजही राजस्थानात वाजविले जाते.


भारताप्रमाणे थायलंड, इंडोनेशिया या सारख्या देशातही रामायण वाचले जाते. थायलंडमधील रामायण कथेनुसार सीता रावणाची मुलगी होती. मात्र तुझ्या मृत्यूला ही कारण बनेल अशी भविष्यवाणी झाल्याने रावणाने तिला जमिनीत दफन केले व नंतर ती जनकाला सापडली. त्यामुळेच रावणाने सीतेबरोबर कधीही गैरवर्तन केले नव्हते. अन्य कथांनुसार रावण चारी वेदांचा अभ्यासक होता पण सामवेदात तो विशेष पारंगत होता. त्याने शिवतांडव, युद्धशास्त्र, कामधेनू असे ग्रंथ रचले होते.

Leave a Comment