देशभरात असे साजरे होते आहे नवरात्र


देशाच्या वेगवेगळ्या राज्यात विविध प्रकारे नवरात्र साजरे केले जाते. नवरात्र ही दुर्गामातेची पूजा आहे मात्र प्रत्येक राज्याच्या त्यासाठीच्या परंपरा, रिवाज व प्रथा निराळ्या आहेत.


बंगालमध्ये दुर्गापूजेचे महत्त्व फारच मोठे आहे. येथे तीन दिवस हा उत्सव होतो व जागोजाग प्रचंड मोठ्या सजावटीच्या मंडपातून दुर्गा स्थापना केली जाते. मोठमोठ्या दुर्गा, गणेश, कार्तिकेय, सरस्वती व लक्ष्मीच्या सुंदर मूर्ती भव्य मंडपातून स्थापल्या जातात. तर शेजारच्या आसाम राज्यात कामाख्या देवीचे नवरात्र केले जाते. बंगाल प्रमाणेच येथे दुर्गापूजा साजरी होते.


महाराष्ट्रात नवरात्र घरोघरी साजरे होते. घट बसतात. हळदीकुंकू होते. सार्वजनिक पद्धतीनेही मंडपात दुर्गेची मूर्ती स्थापन केली जाते. या दिवसांत महाराष्ट्रात भोंडला खेळला जातो. अनेक जण नऊ दिवसांचे उपवास करतात. कांही ठिकाणी नवव्या दिवशी तर कांही ठिकाणी दसर्‍याला उपवास संपतात. शेजारी गुजराथ राज्यात नवरात्राचा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो. या काळात जागोजागी गरबा या पारंपारिक नृत्याचे कार्यक्रम होतात तसेच दांडिया खेळला जातो. गुजराथेत या दिवसांत मातीची सुंदर भांडी व दिवे पुजले जातात.

बिहार व उत्तरप्रदेशात नवरात्राच्या बहुतेक प्रथा समान आहेत. या दोन्ही राज्यात नवरात्राच्या शेवटच्या दिवशी कुमारिकांना जेवण दिले जाते. देवी स्थापनेबरोबर दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात. देवी मंदिरातच मंडप उभारून प्रतिमा स्थापली जाते व त्याची पूजा केली जाते.


तमीळनाडूत शेवटच्या तीन दिवसांत दुर्गा, सरस्वती व लक्ष्मी पूजा केली जाते. तरूण मुली, महिला सुंदर लाकडी मंडपीत बाहुल्या ठेवतात. आंध्रात अविवाहित मुलेमुली मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून सामुहिक पूजा करतात त्याला बठउकम्मा पांडुगा असे म्हटले जाते. यात फुलांची रास रचली जाते व शेवटच्या दिवशी पाण्यात विसर्जन केले जाते. कर्नाटकात विजयनगर राजांनी १७ व्या शतकांत नवरात्र परंपरा सुरू केल्याचे सांगितले जाते. त्याला नादहबाबा असे म्हणतात. आई महिषासूर मर्दिनीची ही पूजा असते. दसरा म्हैसूर मध्ये पाहण्यासारखा असतो. येथील राजमहाल अतिशय आकर्षक पद्धतीने सजविला जातो व शृंगारलेल्या हत्तींच्या मिरवणुका काढल्या जातात.


पंजाबात ही नवरात्रात नऊ दिवस मंदिरात जागरण केले जाते. तर छत्तीसगढच्या बस्तर आदिवासी भागात ७५ दिवसांचा हा सण असतो. देवी दंत्तेश्वरीची रथातून मिरवणूक निघते ५०० वर्षे ही परंपरा पाळली जात आहे. हिमाचल तर अनेक देवीदेवतांचे माहेरघर. मात्र देशांच्या अन्य राज्यांपेक्षा येथे थोडे उशीरा नवरात्र साजरे होते. बियास नदीच्या काठावर लाकूड व गवत जाळून त्याची सांगता केली जाते. हे रावणदहनाचे सचक मानले जाते.

Leave a Comment