रावण पुतळ्यांनाही यंदा जीएसटीची झळ


दसर्‍याला उत्तर प्रदेशात व अन्य कांही राज्यात जोरात साजर्‍या केल्या जाणार्‍या रावणदहन कार्यक्रमाचा रंग यंदा थोडा फिका पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचे कारण आहे जीएसटी. रावणाचे तसेच मेघनाद व कुंभकणाचे पुतळे या सोहळ्यानिमित्त तयार करून त्यांना शोभेच्या दारूने जाळले जाते. यंदा या मूर्ती बनविण्यासाठी लागणार्‍या सर्व प्रकारच्या म्हणजे बांबू, तारा, कागद यांच्या दरात जीएसटीमुळे वाढ झाल्याने मूर्तींच्या किमतीही वाढल्या आहेत. परिणामी कलाकरांकडे यंदा छोट्या मूर्तींसाठी ऑर्डर आल्या असून मेघनाद व कुंभकर्णाच्या पुतळ्याना अजिबातच मागणी नसल्याचे समजते.

दिल्लीजवळ असलेले तातारपूर हा रावण व अन्य मूर्तींचा मुख्य बाजार आहे. छुट्टन लाल यांनी १९७३ पासून येथे हा व्यवसाय सुरू केला व आज त्यांचे अनेक शिष्य याच व्यवसायात आहेत. छुट्टन यांना रावणवाला बाबा म्हणून ओळखले जाते. ते म्हणाले आमच्याकडच्या मूर्तींना उत्तरप्रदेशाबरोबरच दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजराथ. पंजाब येथून मागणी असते. मात्र यंदा कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने रावण मूर्तीच्या किमतीही वाढल्या आहेत. दरवेळी ४० फुटी मूर्तींना मागणी असते यंदा मात्र १० ते २० फुटी मूर्तींनाच मागणी आहे.

दसर्‍यापूर्वी साधारण ५० दिवस या मूर्ती बनविण्याचे काम सुरू होते. मूर्तीचा दर फुटांवर अवलंबून असतो. गतवर्षी तो २५० रूपये होता यंदा तो ३५० वर गेला आहे. त्यामुळे ४० फुटी मूर्तीचा दर यंदा १२ ते १५ हजार रूपये आहे. रावणाच्या मूर्तीला मोठी मिशी काढली जाते तर मेघनाद व कुंभकणांच्या मूर्तींना छोटी मिशी असते. यंदा रामलिला आयेाजकांनी १० ते २० फुटी मूर्तींकरताच मागणी नोंदविली आहे यामागे मूर्तींचे वाढलेले दर हेच मुख्य कारण आहे.

Leave a Comment