दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे वारंवार विपश्यना करतात, हे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या या विपश्यना ध्यान शिबिराचा प्रभाव त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांवरही पडला असून आपचे अनेक नेते विपश्यना करत आहेत.
केजरीवाल यांच्यासोबत ‘आप’च्या अन्य नेत्यांचीही विपश्यना
विपश्यना करणाऱ्यांमध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल, दिल्ली शाखेचे माजी समन्वयक दिलीप पांडे, पंजाबचे माजी प्रभारी दुर्गेश पाठक आणि अतिशी मर्लेना यांचा समावेश आहे. केजरीवाल यांनी अलीकडेच नाशिकजवळ इगतपुरी येथील ध्यान शिबिरात भाग घेतला होता.
‘आता विपश्यना ध्यान कोर्स संपला आहे. तो अत्यंत उल्हसित करणारा होता. एखाद्या दिवशी मी व माझी पत्नी स्वतःला पूर्णपणे ध्यानात लीन करू शकू,’ असे ट्वीट अरविंद केजरीवाल यांनी 19 सप्टेंबर रोजी केले होते.
केजरीवाल यांनी गेल्या 10 वर्षांत 10 दिवसांचे ध्यान शिबिराचे 35 सत्र पूर्ण केले आहेत, असे आपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. प्रत्येक महत्त्वाच्या निवडणुकीपूर्वी किंवा नंतर ते विपश्यना सत्रात सहभागी होतात. वर्ष 2014 मधील लोकसभा निवडणुकीनंतर ते पुण्यात विपश्यना शिबिरात सहभागी झाले होते.