महाराष्ट्राचे खजुराहो : कोपेश्वर मंदिर


कोल्हापूर पासून साधारण साठ किलोमीटर अंतरावर, कृष्णा नदीच्या काठी खिद्रापूर गाव वसलेले आहे. या गावामध्ये स्थित असलेले कोपेश्वर मंदिर भगवान शिवशंकराला समर्पित आहे. अतिशय भव्य असे, अत्यंत अप्रतिम शिल्पकलेने नटलेल्या या मंदिरामध्ये शिव आणि विष्णू या दोहोंचा वास आहे. इतकी वर्षे, हे मंदिर काहीसे आड बाजूला असल्याने तितकेसे ज्ञात नव्हते. पण अतिशय लोकप्रिय झालेल्या “ कट्यार काळजात घुसली “ या चित्रपटाचे एक गीत या मंदिराच्या परिसरात चित्रित करण्यात आले. त्या नंतर ह्या मंदिराला प्रसिद्धी लाभून तिथे पर्यटकांची येजा सुरू झाली. गेली दोन वर्षे या परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याचे दिसून येते.

खिद्रापुरचे हे भव्य मंदिर सातव्या शतकामध्ये, चालुक्यांच्या राजवटीत बांधले गेले. पण त्या काळी सतत होणाऱ्या राजकीय युद्धांमुळे या मंदिराच्या निर्माण कार्यामध्ये सातत्य नव्हते. काही काळाने तर हे निर्माण कार्य संपूर्णपणे बंदच झाले. त्यानंतर सिलहार घराण्याचे राजे गंधारादित्य यांच्या काळी हे निर्माण कार्य पुनश्च सुरु करण्यात आले. अखेरीस देवगिरीच्या यादव कुळातील राज्यकर्त्यांनी या मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण करविले. ह्या मंदिराचे निर्माण पूर्ण होण्यासाठी तब्बल पाचशे वर्षांचा अवधी लागला. हे मंदिर बाराव्या शतकात पूर्णपणे तयार झाले.

या मंदिराच्या पूर्वेकडील द्वारापाशी एक शिला असून, त्यावर संस्कृत भाषेमधील शिलालेख ही आहे. यादव कुळातील राजा सिंघनदेव याच्या राजवटीमध्ये ११३६ साली या मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण झाल्याचा उल्लेख शिलालेखामध्ये केलेला आहे. मंदिराची प्रदक्षिणा करतना या मंदिरातील अतिशय नैपुण्याने साकारलेली शिल्पकला पाहून थक्क व्हावयास होते. हे मंदिर चार विभागांमध्ये वाटले गले आहे. स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ कक्ष, आणि गर्भ गृह असे ह्या मंदिराचे चार भाग आहेत. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम पाहायला मिळतो तो स्वर्गमंडप. या स्वर्गमंडपामधून आकाशाचे दर्शन होत असून अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या ४८ खांबांवर याचे छत तोललेले आहे. काळ्या खडकामध्ये या स्वर्गमंडपाचे निर्माण केलेले आहे. शिवशंकराला हे मंदीर समर्पित असूनही या मंडपाच्या प्रवेशद्वारापाशी नंदीची मूर्ती नाही.

या मंदिराला कोपेश्वर नाव कसे पडले याबद्दल एक मोठी रोचक कथा सांगितली जाते. ही कथा अशी, की राजा दक्षाची कन्या सती हिचा भगवान शिवाशी झालेला विवाह राजा दक्षाला मुळीच पसंत नव्हता. त्यामुले तो करीत असलेल्या यज्ञाला त्याने शिव – सती यांना आमंत्रित केले नव्हते. आपल्याला आमंत्रण का पाठविले गेले नाही याची विचारणा करण्यासाठी सती नंदीवर आरूढ होऊन तिथे गेली असता, राजा दक्षाने यज्ञासाठी जमलेल्या सर्व अतिथींसमोर सतीचा भयंकर अपमान केला. हा अपमान सहन न होऊन सतीने अग्निकुंडामध्ये उडी घेऊन प्राणत्याग केला. ही घटना समजताच शिव कोपाविष्ट झाले आणि त्यांनी राजा दक्षाचा वध केला. त्यानंतर त्यांचा कोप शांत करण्यासाठी भगवान विष्णु त्यांना या मंदिराच्या ठिकाणी घेऊन आले. शिवाचा क्रोध शांत झाल्यानंतर त्यांनी दक्षाला पुनश्च जीवनदान दिले, पण त्याला मनुष्याचे धड आणि बकरीचे शिर दिले. आणि म्हणून या मंदिरामध्ये शिव आणि विष्णू या दोहोंची लिंगे आहेत, अशी आख्यायिका आहे.

अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या शिल्पकलेचा नमुना असणारे हे मंदिर तसे दुर्लक्षितच आहे, पण आता पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे हे मंदिर हम्पी, अजंता, वेरूळ येथील वास्तूंप्रमाणे ओळखले जायला लागून त्याचे जतन करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील अशी आशा इतिहासकार व्यक्त करतात.

Leave a Comment