कंस्ट्रक्‍शन मॅनेजमेंट


स्मार्टसिटीच्या माध्यमातून देशातील प्रमुख महानगरात अत्याधुनिक सोयीसुविधा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. वाढत्या टाऊनशिप आणि गगनचुंबी इमारतीच्या बांधकामाबरोबरच एक नवीन मोठी संधी उमेदवारांसमोर येऊ घातली आहे. ती संधी म्हणजे कंस्ट्रक्‍शन मॅनेजमेंट (बांधकाम व्यवस्थापन) होय.

बिल्डिंगच्या देखभालीसाठी किती खर्च येईल, पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी काळजी घेणे यासारख्या महत्त्वाच्या बाबी ध्यानात घ्याव्या लागतात. म्हणूनच एक कुशल कंस्ट्रक्‍शन मॅनेजर हा जगभरात तयार होणाऱ्या बांधकाम निर्मिती क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेत असतो.

कामाचे स्वरुप – बांधकाम व्यवस्थापकाला बिल्डिंग आणि सोसायटीचा विकास लक्षात घ्यावा लागतो. त्याचेवळी कायदेशीर तरतूदी, व्यवसाय, पायाभूत सुविधा, निधीची तरतूद, अर्थसाह्य, तंत्रज्ञान आणि व्यवसायाची रणनिती लक्षात घ्यावी लागते. बिल्डिंग निर्मितीदरम्यान प्रकल्पावर लक्ष ठेवणे ही एक मोठी जबाबदारी असते. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमादरम्यान माहिती तंत्रज्ञान, प्रोजेक्‍ट फायनान्स, मनुष्यबळाचे व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती याचे अवलोकन करावे लागते. या क्षेत्रात असणारे बारकावे देखील समजून घ्यावे लागतात. म्हणूनच अभ्यासक्रम शिकत असताना एखाद्या फर्म किंवा कंपनीशी संलग्न होऊन प्रत्यक्षपणे कामाचा अनुभव घ्यावा लागतो. यातून तो स्वत: व्यवस्थापन कौशल्य आणि क्षमता हस्तगत करू शकतो.

अभ्यासक्रमाचे स्वरुप – या क्षेत्रात अनेक प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे कोर्स इंटरमिडिएटनंतर करता येऊ शकतात. सर्टिफिकेट कोर्सला बारावीनंतर प्रवेश घेता येऊ शकतो. भारतात अनेक संस्थांमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम कंस्ट्रक्‍शन मॅनेजमेंट आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये उपलब्ध आहे. त्याचवेळी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्यूएट कोर्सला प्रवेश पदवीनंतर घेता येऊ शकतो. विद्यार्थी कंस्ट्रक्‍शन मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, एम.टेक किंवा एमबीए करू शकतो. इंजिनिअरिंग मॅनेजमेंट किंवा टेक्‍नॉलॉजी मॅनेजमेंटमध्ये अनेक संस्था एमबीए अभ्यासक्रम संचलित करतात. इंजिनिअरिंगमध्ये रस असल्यास सिव्हिलमध्ये बीटेक पदवी प्राप्त केल्यानंतरही या क्षेत्रात येऊ शकतो. याशिवाय अनेक ऑनलाइन कोर्स देखील या क्षेत्रात उपलब्ध आहेत.

रोजगाराची संधी – या क्षेत्रात कुशल इंजिनिअर किंवा उमेदवाराला नेहमीच मागणी राहिली आहे. सध्या या क्षेत्रात रोजगाराची मागणी प्रचंड वाढली असून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मोठ्या कंस्ट्रक्‍शन कंपनीत संधी आहेच याशिवाय सीपीडब्लूडी, पीडबल्यूडी, मेट्रो, भारतीय रेल्वे, नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडियासारख्या कंपनीत नोकरी मिळू शकते. याशिवाय आंतराष्ट्रीय पातळीवरच्या बांधकाम संस्थांमध्ये देखील भरपूर संधी आहेत.

Leave a Comment