सर्वचिंता हरण करणारे माँ चिंतापूर्णी धाम


भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी व सर्वचिंताहरण करणारी माँ चिंतापूर्णी देवी हे हिदूंचे हिमाचल प्रदेशातील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. देशभरात देवी सतीची जी ५१ शक्तीपीठे आहेत त्यातील हे एक आहे. येथे देवी सतीचे चरण म्हणजे पावले पडली होती असा समज आहे. चिंतापूर्णी धामचा सारा प्रवासच मुळी अतिशय निसर्गरम्य भागातून आहे व हा प्रवास पर्यटकांच्या मनावर कायमची भुरळ घालतो.

येथे देवी पिंडीस्वरूपात आहे. वडाच्या महाप्रचंड झाडाखाली मंदिराचा पसारा आहे व या मंदिरावर चारी बाजूंनी सोन्याचा पत्रा मढविला गेला आहे. नवरात्र व श्रावणात येथे मोठी जत्रा भरते व देशभरातून भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. या देवीच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतातच पण आपल्याला अशक्य किंवा असंभव वाटणारी अनेक कामेही क्षणात पूर्ण होतात असा भाविकांचा विश्वास आहे. नवरात्रात देवीच्या मंदिरात प्रत्येक रात्री जागरण सोहळा होतो. उन्हाळ्याच्या दिवसात पहाटे चार पासून रात्री ११ वाजेपर्यंत मंदिर खुले असते तर हिवाळ्यात पहाटे पाच ते रात्री १० पर्यंत देवी दर्शन घेता येते.

या देवीला शिरा, लाडू, बर्फी, बत्तासे, नारळ यांचा प्रसाद दाखविला जातो. जे भाविक कांही नवस बोलतात ते नवसपूर्तीनंतर लाल चुनरी देवीला अर्पण करतात. या ठिकाणी भेट देण्यासाठी फेब्रुवारी ते एप्रिल हा काळ सर्वोत्तम आहे.

Leave a Comment