गेल्या चार महिन्यांपासून पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाल्यामुळे चिनी गुंतवणूकदारांना तब्बल १५४ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
चीनच्या गुंतवणूकदारांना पाकिस्तानात १५४ कोटींचा फटका
डॉन या पाकिस्तानच्या प्रमुख वर्तमानपत्राने या संबंधीचे वृत्त दिले आहे. या बातमीनुसार चिनी गुंतवणूकदारांना पाकिस्तानातील त्यांच्या गुंतवणुकीवर २५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. गेल्या एक वर्षात त्यांची गुंतवणूक २.३ कोटी डॉलरने म्हणजेच १५४ कोटी रुपयांनी कमी झाली आहे. पाकिस्तानी रुपयांमध्ये हा आकडा २८० कोटी रुपये एवढा आहे.
गेल्या चार महिन्यांपासून पाकिस्तानचा शेअर बाजार वेगाने खाली आला आहे. या काळात प्रमुख निर्देशांक २० टक्क्यांनी खाली आला आहे. या ४ महिन्यात गुंतवणूकदारांचे सुमारे १ लाख कोटी पाकिस्तानी रुपये बुडाले आहेत. यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असे डॉनने म्हटले आहे.
चायना फायनेंशियल फ्यूचर्स, शांघाय स्टॉक एक्सचेंज आणि शानजेन स्टॉक एक्सचेंजने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पाकिस्तानच्या शेअर बाजारात २८ रुपए प्रति शेअरच्या हिशेबाने ३० टक्के वाटा विकत घेतला होता. तो संपूर्ण व्यवहार ८.५ कोटी डॉलरमध्ये झाला होता. आता निर्देशांक कोसळल्यामुळे शेअरची किंमत २०.२४ प्रति शेअर एवढी कमी झाली आहे. या तिन्ही गुंतवणूकदारांना आतापर्यंत २८ टक्के म्हणजे २.३ कोटी डॉलरचे नुकसान झाले आहे, असे डॉनने म्हटले आहे.