बेनझीरचा खुनी कोण ?


पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची २००६ साली झालेली हत्या कोणी केली याचा काही खुलासा झालेला नाही पण सध्या परागंदा असलेले माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना न्यायालयाने आरोपी ठरवले असून त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा अशी शिफारस केली आहे. या खटल्यातील काही आरोपींना न्यायालयाने निर्दोष ठरवून सोडून दिले असले तरी कुप्रसिद्ध अतिरेकी बैतुला मसुद याला दोषी ठरवले आहे. अज्ञात स्थळी रहात असलेल्या जनरल मुशर्रफ यांनी या निकालानंतर महिनाभराने आता तोंड उघडले असून आपल्यावर लावण्यात आलेला आरोप फेटाळून लावला आहे. बेनझीर भुत्तोची हत्या त्यांचा पती आसिफ अली झरदारी यांनीच केली असल्याचा दावा मुशर्रफ यांनी केला आहे.

हा आरोप खळबळजनक आहेच पण मुशर्रफ यांनी आपल्या या दाव्याचे जे समर्थन केले आहे ते अधिक खळबळजनक आहे. त्यांनी स्वत:वरचा आरोप फेटाळताना केलेले स्पष्टीकरण पटण्यासारखे आहे. ही हत्या बैतुला मसूद याने केली असेल तर त्याने कोणाच्या सांगण्यावरून ही हत्या केली याचा शोध घेतला पाहिजे असे मुशर्रफ यांचे म्हणणे आहे. आपले मसुद यांच्याशी सख्य नव्हते. उलट तो आपल्याला मारायला टपलेला होता तेव्हा त्याला सुपारी देऊन आपण बेनझीरचा खून केला असण्याची शक्यता नाही असा मुशर्रफ यांचा युक्तिवाद आहे. त्यात एकवेळ तथ्य आहे पण बैतुला मसूद हा झरदारी यांचा मित्र होता का? हे पाहिले पाहिजे. तसे काही दिसत नसेल तर मुशर्रफ यांच्या प्रमाणेच झरदारी हेही निर्दोष ठरायला हवे आहेत.

मुशर्रफ यांचा युक्तिवाद वेगळाच आहे. भुत्तो यांच्या हत्येनंतर झरदारी अध्यक्ष झाले होते पण त्यांनी आपल्या या कार्यकाळात आपल्या पत्नीच्या हत्येची चौकशी केली नाही. याचा अर्थ ते खुनी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे बेनझीरच्या हत्येचा कसलाच फायदा आपल्याला होणार नव्हता. तो झरदारी यांंना होणार होता आणि म्हणूनच त्यांनी हा खून केला आहे असे मुशर्रफ यांचे म्हणणे आहे. अर्थात झरदारी यांना आपल्या पत्नीच्या हत्येचा कसला फायदा होणार होता याचा कसलाही उलगडा मुशर्रफ यांनी केला नाही. पण तो होणार होता असे मान्य केले तरीही एखाद्या खुनाचा तपास करण्याचा आणि दावे करण्याचा मुशर्रफ यांचा हा प्रकार मोठा विचित्र वाटतो कारण बेनझीर यांच्या हत्येचा लाभ अनेकांना होऊ शकत होता.

Leave a Comment