अजय सिंह यांच्याकडे एनडीटीव्हीमधील सुमारे ४० टक्के हिस्सा ?


मुंबई – सीबीआय चौकशीचा ससेमिरा ‘एनडीटीव्ही’चे सहसंस्थापक प्रणव रॉय, राधिका रॉय आणि प्रोमोटर आरआरपीआर हॉल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडमागे लागला असतानाच आता मोठे फेरबदल एनडीटीव्हीमध्ये होण्याची शक्यता असून एनडीटीव्हीमधील समभाग स्पाइसजेटचे सहसंस्थापक आणि मालक अजय सिंह हे विकत घेणार असल्याचे वृत्त आहे. पण एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना हे वृत्त एनडीटीव्हीने फेटाळून लावले आहे.

सीबीआयने जूनमध्ये एनडीटीव्हीचे सहसंस्थापक डॉ. प्रणव रॉय, त्यांच्या पत्नी राधिका यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरावर आयसीआयसीआय या खासगी क्षेत्रातील बँकेची सुमारे ४८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन छापे मारले होते. प्रणव रॉय, राधिका रॉय आणि एनडीटीव्हीचे प्रोमोटर यानंतर अडचणीत आले होते.

यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार एनडीटीव्ही आणि स्पाइस जेटमध्ये करार होणार असल्याचे समजते. यानुसार अजय सिंह यांच्याकडे एनडीटीव्हीमधील सुमारे ४० टक्के हिस्सा असेल. तर प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांच्याकडे २० टक्के हिस्सा असेल. सुमारे ५०० कोटी रुपयांचा अजय सिंह आणि एनडीटीव्हीतील हा करार असेल. एनडीटीव्हीसोबत करार होणार असल्याचे वृत्त स्पाइसजेटच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावले आहे. तर हे वृत्त निराधार असल्याचे एनडीटीव्हीनेही सांगितले.

Leave a Comment