लक्ष्मीपुत्राचा वनवास


श्रीमंत लोकांचे एक दु:ख असे असते की त्यांच्या मुलांना कधीच गरिबीचे चटके माहीत नसतात आणि तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत असल्याने पैसा कमवायला किती कष्ट करावे लागतात हे कळत नाही. त्यामुळे त्यांच्यात स्ट्रगल करण्याची ताकद निर्माणच होत नाही. त्यांना तळागाळातले खरे आयुष्य काय असते हेही माहीत नसते. एका मोठ्या व्यापार्‍याने चहाच्या धंद्यात पदार्पण केले आणि त्याची सारी सूत्रे आपल्या एम बी ए झालेल्या मुलाच्या हातात दिली. काही लाख रुपये खर्चायलाही दिले. त्या मुलाने आधी मुंबईत एक पॉश ऑफिस घेतले व बराच पैसा खर्च करून ते सजवले. जाहीरातीसाठी काही महागडे फलकही झळकवले आणि ग्राहकांची वाट पहात बसला पण काही झाले नाही.

त्याच्या वडलांना हे कळले तेव्हा त्यांनी आपल्या या मुलाला एक धडा दिला. पॉश ऑफिसमध्ये बसून धंदा होत नसतो. तुला तुझ्या ग्राहकांना भेटावे लागेल आणि त्यांना कसला चहा हवा आहे हे समजून घ्यावे लागेल. मुंबईतले हरे कृष्ण हिरे कंपनीचे मालक सावजी ढोलकिया यांनी आपल्या मुलाला आपल्या सहा हजार कोटी रुपये उलाढाल असलेल्या कंपनीत सरळ प्रवेश न देता त्याला जीवनाचा अनुभव घ्यायचा सल्ला दिला. त्यांचा हा प्रयोग सध्या व्यापार विश्‍वात चर्चेचा विषय झाला आहे. त्यांनी आपल्या मुलाला कष्टाचे जीवन काय असते हे अनुभवण्यासाठी घर सोडून महिनाभर हैदराबादला पाठवले. त्याला त्यांनी गेल्या ४ जुलैला विमानतळावर नेले. त्याच्या हातात विमानाचे तिकिट ठेवले. ते कोणत्या गावाचे आहे हे त्याला विमानतळावर गेल्यानंतरच समजले. ते हैदराबादचे तिकिट होते.

तो आता हैदराबादेत उतरला तेव्हा त्याला आपले खरे नाव लपवायचे होते. शिवाय वडलांनी त्याचा मोबाईल फोन काढून घेतला होता. त्याला खर्चायला केवळ पाचशे रुपये दिले होते. त्याने तेवढ्या भांडवलावर हैदराबादेत मिळेल त्या नोकर्‍या करीत महिना दोन महिना रहावे आणि हा कालावधी संपल्यानंतरच आपण कोठे आहोत हे कळवावे अशी सक्त ताकीद त्याला देण्यात आली होती. तोही तयार निघाला. त्याने हैदराबादेत एक कँटिनमध्ये नोकरी धरली. ती नोकरी आठवडभार करून नंतर एका कुरियर सर्व्हिसमध्ये डिलेव्हरी बॉय म्हणून काम केले. अशाच तीन नोकर्‍या करून त्याने काही दिवसानंतर फोनवरून आपल्या घरी आपण कोठे आहोत हे कळवले. ढोलकिया यांना सात मुले असून त्यातल्या प्रत्येकाला त्यांनी जीवनाचा असाच अभ्यास करायला लावला आहे.

Leave a Comment