कमकुवत सादरीकरणामुळे फसलेला ‘हसीना पारकर’


एक अजनबी, शूट आऊट एट लोखंडवाला आणि जंजीर या सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीवर अर्थातच हसिना पारकरवर आधारित ‘हसिना पारकर हा चित्रपट आज बॉक्स ऑफिस रिलीज झाला आहे. तर मग पाहूया कसा आहे हसिना पारकर? हा चित्रपट.

एका कोर्ट रुम ड्रामापासून हसिना पारकर या चित्रपटाची कथा सुरु होते. हसिना पारकर या कोर्ट रुममध्ये वकिलाच्या प्रश्नांची उत्तर देत असते, तिला कधी भाऊ दाऊद इब्राहिमबाबत प्रश्न विचारले जातात, तर कधी तिच्या पतीविषयी चौकशी केली जाते. दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी या चित्रपटात हसिना पारकरचा प्रवास रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

जसजशी चित्रपटाची कथा पुढे सरकते तसतसे चित्रपटात हिंदू मुस्लिम दंगली, बाबरी मस्जिद, मुंबई बॉम्ब ब्लास्ट अशा अनेक घटनांचा संदर्भ येत जातो. अभिनेत्री श्रद्धा कपूरने एवढ्या सगळ्या घटनांचा समावेश असतानाही साकारलेली हसिना तुम्हाला प्रभावित करण्यात अयशस्वी ठरते. हसीना पारकरच्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय देण्यात श्रद्धा अयशस्वी ठरते. याच बरोबर तिच्या भावाने अर्थातच सिद्धांत कपूरने साकारलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमही हवा तितका दमदार वाटत नाही. हसिना पारकर या चित्रपटाचे स्क्रीनप्ले चित्रपटाच्या कहाणीपेक्षाही कमजोर असल्यामुळे चित्रपट बोरींग होत जातो.

संगीतकार अमर मोहिले यांनी बॅकग्राउंड स्कोर खूपच दमदार दिला आहे. तो चित्रपटाच्या थीमला एकदम फिट बसतो. हसिना पारकर या चित्रपटाच्या उत्तार्धापेक्षा चित्रपटाचा पूर्वार्ध बरा झाला आहे. चित्रपटातील गाणीही काही खास वाटत नाही. विशेषकरुन चित्रपटातील कोर्ट रुम ड्रामा हा गंभीर स्वरुपाचा न वाटता, हास्यास्पद वाटतो. तसे पाहायला गेले तर दिग्दर्शकाला यावर आणखी मेहनत घ्यायला हवी होती.

३० ते ३५ कोटींच्या आसपास हसिना पारकर या चित्रपटाचा बजेट आहे, पहिल्या दोन आठवड्यात चित्रपटाने जर चांगली कमाई केली तर शकला तर निर्मात्यांचे नशीब उजाडले असे म्हणावे लागेल. तेव्हा तुम्ही जर श्रद्धा कपूरचे मोठे फॅन आहात तर एकदा जाऊन चित्रपट पहायला हरकत नाही.