नवरात्रात उपवास करण्याची प्रथा आता उलट वाढत चालली आहे कारण आपले पंतप्रधान नरेन्द्र मोदी हेच नवरात्रात कडक उपवास करीत असतात. दोन वर्षांपूर्वी या उपवासाच्या काळात परदेशाच्या दौर्यावर होते पण तिथेही त्यांनी आपला उपवास आपल्या पद्धतीने केलाच त्यामुळे या उपवासाला प्रतिष्ठा मिळाली आहे. उपवास करणारांचे दोन वर्ग असतात. एक असतो तो भाविक वर्ग तर दुसरा असतो तो जागरूक वर्ग. भाविक वर्ग या उपवासाकडे पुण्याचा मार्ग म्हणून पाहतात तर सुशिक्षित लोक त्याकडे शरीरशुद्धीचा एक मार्ग म्हणून पहातात. भाविक वर्गात या उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये याचा निर्णय धार्मिक पद्धतीने आणि शक्यतो परंपरेला धरून केला जातो. त्यामुळे खाण्याला काही मर्यादा नसते.
मधुमेहींचा उपवास
दुसरा वर्ग मात्र शस्त्रीय दृष्टीकोनातून निर्णय घेतात आणि शरीराला काय उपयुक्त आहे आणि शरीरशुद्धीला काय केले पाहिजे याच्या निकषावर निवड करतात. असा उपवास शरीरातली घातक द्रव्ये बाहेर पडावीत म्हणून केला जात असल्याने या वर्गाचा भर हलके आणि पचायला सोपे पदार्थ खाण्यावर असतो. असा उपवास करताना मधुमेहींना काही पथ्ये पाळावी लागतात. काही काळजी घ्यावी लागते. होमीओपथिक डॉक्टर प्रमोद अगरवाल यांनी या बाबत काही टिप्स दिल्या आहेत. उपवासात लंघन हा प्रकार असतो त्यात अन्नच खाल्ले जात नाही. पण मधूमेहीना असे पोट मोकळे ठेवण्याचे लंघन परवडत नाही. त्यांना हलका आहार घेऊन उपवास करावा लागतो आणि तोही दर दोन तासांना थोडा थोडा आहार घ्यावा लागतो.
तसे केल्याने ब्लड शुगरची पातळी टिकून रहाते. ती पातळी नीट राखली गेली आहे की नाही याची तपासणीही करीत रहावे लागते. ही पातळी ७० च्या खाली आली तर उपवास मोडावा लागतो. उपवासाच्या पहिल्या काही तासात ही पातळी अजून खाली आली तर चक्क उपवासाचा बेत रद्द केला पाहिजे. काही वेळा उपवासाने गळून गेल्या सारखे वाटते. मग लोक उत्तेजना मिळावी यासाठी चहा किंवा कॉफी पीत राहतात. मधूमेहींनी अशा प्रसंगात सतत चहा किंवा कॉफी प्राशन करू नये. त्यांच्या ऐवजी पाणी प्यावे. वेळ पडल्यास साखरेपासून मुक्त असलेली काही पेये प्यावीत. त्यात शहाळे, ताक, लेमोनेड यांचा समावेश करायला काही हरकत नाही. शेंगदाणे, पनीर, शिंगाडा, काकडी यांचे सेवन केल्यानेही शक्ती मिळते आणि उपवासही टिकतो हे लक्षात घेतले पाहिजे.