भारतातील ऐतिहासिक द्वारे


भारत हा प्राचीन काळापासून सहिष्णु देश मानला जातो.येणार्‍या सर्वांचे प्रेमाने बाहू पसरून स्वागत करणार्‍या या देशात वारंवार नको असलेले पाहुणेही अनेकदा चालून आले व भारतातच दीर्घ काळ राहिले. भारतात अनेक प्राचीन वास्तूशिल्पे आहेत. त्यात कांही स्मारके आहेत, किल्ले आहेत, इमारती आहेत, मिनार आहेत, महाल आहेत तशीच भारताचा इतिहास सांगणारी द्वारेही आहेत. या द्वारांचा किंवा गेटचा इतिहासही मोठा रोमांचकारी आहे. अशा तीन दरवाज्यांची माहिती आपण येथे घेत आहोत.

बुलंद दरवाजा- आगर्‍यापासून ४३ किमीवर असलेल्या फतेपूर सिक्री येथील नावाप्रमाणेच बुलंद असलेला हा दरवाजा अकबरकालीन आहे. राजा अकबराने तो १६०२ साली बांधला. बुलंद हा फारसी शब्द असून त्याचा अर्थ आहे महान, उंच. जगातले हे सर्वात मोठे प्रवेशद्वार मानले जाते. त्याच्या बांधकामावर हिंदू व फारसी स्थापत्याचा प्रभाव आहे. दख्खनवर अकबराने मिळविलेल्या विजयाची स्मृती म्हणून तो बांधला गेला.४२ पायर्‍या चढून या ६३ मीटर उंच, ३५ मीटर रूंद दरवाजातून आत जावे लागते. लाल दगडात बांधलेल्या या दरवाजावर पांढर्‍या संगमरवराचे काम केले आहे. त्याचा आकार अष्टकोनी असून तो घुमट व मिनारांनी नटलेला आहे.


गेट वे ऑफ इंडिया- देशाची औद्योगिक राजधानी मुंबईच्या दक्षिण अरबी समुद्र किनार्‍यावरचे हे भव्य प्रवेशद्वार. त्याची उंची आहे २६ मीटर. राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या २ डिसेंबर १९११ च्या भारत आगमनाची आठवण म्हणून हे उभारले गेले. वास्तूकार जॉर्ज विंटेट याने त्याचे डिझाईन केले असून ते १९२४ साली बांधून पूर्ण झाले. येथूनच समुद्र सफरीच्या बोटी सुटतात.


इंडिया गेट- राजधानी नवी दिल्लीत राजपथावर उभारले गेलेले ४३ मीटर उंचीचे हे विशाल गेट भारताचे राष्ट्रीय स्मारक आहे. त्याला प्रथम किंग्जस वे असे म्हणले जात असे. ते अखिल भारतीय युद्ध स्मारक आहे. त्याचे डिझाईन सर एडवड लुटियन यांनी केले असून पॅरिसच्या आर्क डे ट्रायम्फवरून त्याची प्रेरणा घेतली गेली आहे. १९३१ साली ते बांधले गेले. तेव्हा ब्रिटीश राज्य होते. ब्रिटीशांच्या बाजूने पहिले महायुद्ध व अफगाणिस्तान युद्ध लढताना वीरमरण आलेल्या ९० हजार सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ते बांधले गेले आहे. त्यावर १३३०० शहीद सैनिकांची नांवे कोरली गेली आहेत. येथे असलेल्या छत्रीत प्रथम पंचम जॉर्जची मूर्ती होती नंतर ती हलविली गेली. आता नुसती छत्री येथे पाहता येते.

Leave a Comment