नवरात्रातील जगदंबेची नऊ रूपे


भारतभर सध्या शारदीय नवरात्राची धुम आहे. हीनदू पर्वात दोन वेळा नवरात्र साजरे केले जाते. एकाला चैत्री व दुसर्‍याला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. देवी पार्वती, लक्ष्मी व सरस्वती यांच्या नऊ रूपांच्या पूजा या काळात केल्या जातात त्यांना नवदुर्गा असे नांव आहे. ही देवी रूपे अनेक सिद्धी देणारी मानली जातात. शिवशक्तीची ही उग्र व सौम्य अशी दोन रूपे. या काळात प्रत्यक्ष दुर्गामातेचे पृथ्वीवर वास्तव्य असते असा समज आहे. देवी भक्तांच्या पूजा या काळात प्रत्यक्ष स्वीकारते असे भाविक मानतात.


शैलपुत्री- दुर्गेचे हे प्रथम रूप नवरात्राच्या पहिल्या दिवशी पुजले जाते. दक्ष प्रजापतीची कन्या सती. तिचा विवाह शिवाबरोबर झाला होता. एका यज्ञाच्या वेळी दक्षाने शंकराला आमंत्रण न केल्याने संतापलेल्या सतीने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले. त्यानंतर ती हिमालयाची कन्या म्हणून पुन्हा जन्मली तीच ही शैलपुत्री.हिलाच पार्वती असे म्हणतात.


ब्रह्मचारिणी – हे देवीमातेचे दुसरे रूप. देवीने ब्रह्मात लीन होऊन तप केले म्हणून ती ब्रह्मचारिणी. हिच्या पुजनाने आपल्यातील शक्ती जागृत होतात व त्या नियंत्रणाचे सामर्थ्यही देवी देते.


चंद्रघंटा- दुर्गेचे हे तिसरे रूप. दुर्बलतेवर साहसाने विजय मिळविण्याचे शिक्षण ती देते. ही दशभुजा आहे. राक्षसांशी युद्ध करून त्यांचा पाडाव करणारी चंद्रघंटा आपल्याला दहा इंद्रियांवर नियंत्रण मिळवून ध्येयप्राप्ती कशी करायची याचे शिक्षण देते.


कुष्मांडा- सूर्याप्रमाणे तेजस्वी असे हे अष्टभुजा देवीचे रूप. कर्मयोगाचा स्वीकार करून तेज प्राप्तीचे शिक्षण देणारे हे रूप. तिच्या चेहर्‍यावरील हसू आपल्यातील जीवनशक्तीचे संवर्धन करणारे आहे. हसतहसत संकटावर मात करा असा याचा संदेश आहे.


स्कंदमाता- भगवान स्कंदाची माता असे हे देवीचे रूप सूर्यमंडळाची अधिष्ठात्री मानले जाते. पूर्ण ब्रह्मांड प्रकाशमान करणारे हे रूप आहे.


कात्यायनी- कात्यायन ऋषींची कन्या म्हणून ही कात्यायनी. कात्यायन ऋषींनी त्यांच्या पोटी देवीने मुलीच्या रूपात जन्म घ्यावा म्हणून देवी भगवतीची कठोर तपस्या केली होती व म्हणून देवीने कात्यायनीच्या रूपाने जन्म घेतला होता.


कालरात्री- म्हणजेच काली. दुर्गेचे हे सातवे रूप. तिचे शरीर अंधारासारखे काळे कुट्ट आहे मात्र गळ्यात चमकणारी माळ आहे.तिला तीन नेत्र आहेत.त्यातून ज्योत तेवते.अंधःकाराचा मुकाबला करून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा ती देते.


महागौरी- आस्था, श्रद्धा व विश्वासाने सुसंपन्न होण्याचा संदेश देणारे हे रूप. देवीची ही अवस्था आठ वर्षांची मानली जाते. तिचा वर्ण शंख, चंद्र व कुंदाच्या फुलाप्रमाणे उज्ज्वल आहे. ही चतुर्भुजा, वृषभ वाहिनी शांतीस्वरूप आहे.


सिद्धीदात्री- दुर्गेचे हे नववे रूप. ती सिंहवाहिनी चतुर्भुजा व प्रसन्नवदना आहे. मार्कंडेय पुराणात ज्या आठ सिद्धी सांगितल्या गेल्या आहेत त्या सर्व सिद्धी देणारी ती सिद्धीदात्री म्हणून ओळखली जाते.

Leave a Comment