महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी आता भाविकांना विमानानेही जाता येणार आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या श्रीसाईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वापराला डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हीएशन म्हणजे डीजीसीएकडून गुरूवारी परवाना दिला गेला आहे. अर्थात ही परवानगी सध्या फक्त दिवसभरातील उड्डाणांसाठी दिली गेली आहे. यासाठी आवश्यक निरीक्षणे डीजीसीएनने पूर्ण केली आहेत.
साईबाबांच्या दर्शनाला आता विमानाने जाऊ शकणार भक्तगण
या विमानतळावरचा रनवे २५०० मीटर लांबीचा असून त्यावर एअरबस ए ३२०, बोईंग ७३७ ही महाकाय विमानेही सहजी उतरू शकणार आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने अहमदनगर मधील काकडी गावाजवळ हा विमानतळ उभारला असून त्यासाठी ९०० एकर जमीन ताब्यात घेण्यात आली होती. या विमानतळासाठी ३५० कोटी रूपये खर्च झाला आहे त्यातील ५० कोटी रूपये साई संस्थान ट्रस्टकडून दिले गेले आहेत. ग्रीन फिल्ड नावाने बांधण्यात आलेल्या या विमानतळाचे श्रीसाईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव बदलण्यास मंत्रीमंडळाने नुकतीच मंजुरी दिली असल्याचेही समजते.