राणे यांची परवड


आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आपल्याच राजकारणाचा बळी देण्याची परंपरा ही बर्‍याच शतकांपासून सुरू आहे. धृतराष्ट्रापासून ती सुरू झालेली आपल्याला दिसते. आपल्या मुलांना सत्ता मिळावी म्हणून धृतराष्ट्राने किती मोठे युद्ध लादले हे इतिहास सांगतो. संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीच्या पहिल्याच ओवीत या धृतराष्ट्राचे वर्णनच मुळी, पुत्रस्नेहे मोहितु, असे केले आहे. या मांदियाळीत बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांचीही गणना होते. त्यांनी आपल्या पुत्र आणि कन्या यांच्या प्रेमापायी आपल्याच संघटना दुबळ्या करून टाकल्या. बाळासाहेबांच्या या घराणेशाहीमुळे शिवसेना कशी नष्ट होण्याच्या मार्गाला लागली आहे हे आपण पहातच आहोत. आता नारायण राणे यांचे पुत्रप्रेम महाराष्ट्रातल्या राजकारणात चर्चेचा विषय झाले आहे. नारायण राणे यांना भाजपात प्रवेश दिला जाणार आहे. भाजपाला सध्या बाहेरचे एकेक नेते हवे आहेत. तसे राणे भाजपात येणे भाजपासाठी अनेक प्रकारे लाभाचे आहे पण राणे आपल्या मुलांना काय देणार असा सवाल करून सौदेबाजी करीत आहेत.

या सौदेबाजीमुळे राणेंच्या भाजपा प्रवेशाचे नाटक रंगत चालले आहे. आपल्याला भाजपात प्रवेश द्यावा आणि आपल्या मुलांनाही लाभाची पदे द्यावीत अशी मागणी ते करीत आहेत पण महाराष्ट्रातले भाजपाचे नेते मुलांबाबत कसलेही आश्‍वासन द्यायला तयार नाहीत. त्यामागे अनेक कारणे आहेत. एकतर राणे यांंची राजकीय किंमत त्यांच्या मुलांनाही पदे देऊन लाभान्वित करावे एवढी नाही आणि त्यांचे दिवटे चिरंजीव हेही काही गुणी नाहीत. आधी शिवसेना आणि आता कॉंग्रेस अशा दोन्ही पक्षांत परवड झाल्यानंतर आता आपण राजकारणातून बाहेर फेकले जाण्याच्या अवस्थेपर्यंत येऊन पोचलो आहोत तेव्हा भाजपा प्रवेशातून आधी आपले पुनर्वसन करून घ्यावे आणि मुलांसाठी अडून राहू नये असे शहाणपणाचे धोरण ठेवण्याएवढे राणे सूज्ञ नाहीत. आपल्या भाजपा प्रवेशाने भाजपाचा काही तरी भलताच फायदा होणार आहे तेव्हा त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना सत्तेची पदे दिली पाहिजेत अशा कसल्या तरी भ्रमात ते वावरत आहेत. असे अविचारी नेते आपल्या अहंकाराला कुरवाळत बसतात आणि त्यातूनच आपल्या राजकारणाचा आपल्याच हाताने नाश करतात. राणे यांची स्वत:विषयीची कल्पना आजच नाहीतर शिवसेनेत असल्यापासून भ्रामक आहे. त्यांना अजूनही आपण खरेच केवढे आहोत याची जाणीव झालेली नाही.

राणे शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आले तेव्हा त्यांच्यासोबत ११ आमदारही कॉंग्रेसमध्ये आले. ती त्यांची ताकद होती. आपण शिवसेनेला यापेक्षा मोठे भगदाड पाडू शकतो असे त्यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींना भासवले होते पण त्यांना ११ आमदारांच्या पेक्षा अधिक मोठा गट शिवसेेनेतून कॉंग्रेसमध्ये आणता आला नाही. कदाचित म्हणूनच कॉंग्रेसमध्ये त्यांना फार किंमत देण्यात आली नाही. कॉंग्रेसमध्ये जाऊन पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. त्यामुळे ते सतत तडफडत राहिले. ते कॉंग्रेसमध्ये आले त्यानंतर दोन वेळा मुख्यमंत्री बदलले गेले पण दोन्ही वेळा त्यांना डावलून अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांना संधी देण्यात आली. हे सारे आपल्या कुवतीनुसार आणि शक्तीस अनुरूप असेच घडत आहे हे सत्य राणे यांना उमगले नाही. या दोन्ही वेळा त्यांंनी आपल्या पदाला शोभणार नाही अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. कॉंग्रेसमध्ये आपली योग्य ती किंमत झाली नाही अशी तक्रार करणार्‍या राणे यांना आपल्या त्या प्रतिक्रियांनी आपली किंमत कमी झाली असेल असे अजिबात वाटत नाही हे त्यांच्या राजकीय समजेचे द्योतक आहे. दरम्यान त्यांंची राजकीय ताकदही कमी झालेली आहे.

त्यांच्यासोबत शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आलेले ११ आमदार आता त्यांच्यासोबत नाहीत. राणे यांच्या कोणत्याही कसोटीच्या प्रसंगात हे ११ आमदार त्यांच्या पाठीशी उभे आहेत असे कधीच दिसलेले नाही. आता आता तर त्यातले काही आमदार कॉंग्रेसमधून बाहेर पडले आहेत. तेव्हा राणे कोणत्या तोंडाने आणि कशाच्या जोरावर किंमत मागत आहेत हे काही समजत नाही. खरे तर भाजपाचे नेते त्यांना आपल्यात का घेत आहेत याचाच उलगडा होत नाही. राणे यांचे उपद्रवमुल्य फार कमी आहे. शिवाय ते शिघ्रकोपी असल्याने पक्षात ते कधी काय करतील आणि कोणत्या वेळी काय बोलतील याचा काही नेम सांगता येत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचे काही स्थान आहे असे म्हणावे तर तसेही दिसत नाही. गेल्या निवडणुकीत त्यांच्या खासदार पुत्राचा आणि त्यांचाही पराभव झालेला आहे. तरीही ते मेळावा वगैर भरवून आपली ताकद दाखवण्याचा खटाटोप करीत आहेत. तशी त्यांची ताकद दिसली तरीही राणे हे काही फार परवडणारे नेते नाहीत. राणे हा काय प्रकार आहे हे शरद पवार यांना नीट माहीत असावे म्हणून त्यांनी राणे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांना राष्ट्रवादीत घेतले नाही. अशा या राणेंना आता आपल्या राजकीय पुनर्वसनाची गरज आहे पण ते याही बाबतीत भाजपाला आपल्या मुलांच्या संदर्भात अटी घालत आहेत. त्यामुळे त्यांचेही पुनर्वसन होत नाही आणि मुलांचेही भवितव्य अधांतरी झाले आहे.

Leave a Comment