आंतरराज्यीय महामार्गांवर धावणार अत्याधुनिक डबलडेकर


केंद्र सरकारने आंतरराज्यीय महामार्गांवर आधुनिक सुविधांनी युक्त संपूर्ण वातानुकुलित अशा डबलडेकर बसेस वापरण्याची योजना आखली असून केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची एक बैठक नुकतीच घेतली आहे. यात देशातील ७५ आंतरराज्यीय महामार्ग निवडण्यात आले आहेत. त्यात दिल्ली- आग्रा, दिल्ली जयपूर, बंगलोर-मंगलोर, बडोदा मुंबई, कोझिकोड- कोची, विशाखापट्टनम- भुवनेश्वर, लखनौ- गोरखपूर, श्रीनगर- जालंदर या महामार्गांचा समावेश आहे.

या डबलडेकर सेवेसाठी केंद्राकडून राज्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. डबल डेकर वापरामागचा हेतू सांगताना अधिकारी म्हणाले की या बसलाही सिंगल बस इतकीच जागा रस्त्यावर लागते मात्र त्यातून दुप्पट प्रवासी प्रवास करू शकतात. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी या बसचा वापर झाला तर रस्त्यांवरची वाहतूक थोडी कमी होण्यास मदत मिळेल तसेच अन्य वाहने व खासगी गाड्या यांनाही वाहतुकीसाठी जागा मिळेल. सध्या देशात खासगी कार्सची संख्या वाढते आहे व बहुतेक राज्य परिवहन मंडळे तोट्यात चालत आहेत. कार्स संख्या वाढल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

प्रवाशांना अत्याधुनिक सुविधांच्या या बसेस उपलब्ध झाल्या तर लांब अंतरासाठी कार वापरण्यापेक्षा प्रवासी या बसेसला प्राधान्य देतील कारण कारसाठी जादा खर्च येत असतो हाही एक हेतू आहे व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली तर परिवहन मंडळ प्रवाशांची संख्याही वाढेल अशीही अपेक्षा केली जात आहे.

Leave a Comment