समुद्रात संशोधकांना सापडल्या ऑक्टोपसनी तयार केलेल्या वसाहती


आठ पायांचा आक्टोपस हाही पाण्याखाली आपल्या वसाहती बनवितो याचे पुरावे अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉईस मधील संशोधकांना मिळाले आहेत. या संशोधकांनी ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनार्‍यावरील समुद्रात ऑक्टोपसनी तयार केलेल्या वसाहतींचा शोध लावला आहे. तसेच या वसाहतीत राहणारे आक्टोपस एकमेकांशी संवाद साधतात, विविध आकारातून एकमेकांशी संपर्क करतात, पाठलाग करतात व वेळेनुसार रंगही बदलतात असेही या संशोधकांना दिसून आले आहे.

संशोधकांनी शोधलेल्या या वसाहतीत साधारण १० ते १५ आक्टोपस आढळले. यावरून आक्टोपस एकटेच राहत नाहीत हे दिसून आले. अशी पहिली वसाहत २००९ मध्ये याच भागात सापडली होती. नवी वसाहत या पूवीच्या वसाहतीजवळच असल्याचे आढळले. समुद्राच्या पाण्यात १० ते १५ मीटर खोल,१८ मीटर लांब व ४ मीटर रूंदीची ही वसाहत आहे. आक्टोपस शिपल्यांच्या ढीगात आपल्या गुहा बनवितात, आपले खाद्य शिंपले वा मृत प्राण्यांच्या कवचांनी झाकून ठेवतात असेही यात दिसून आले. या ठिकाणी चार कॅमेरे लावून आक्टोपसच्या हालचाली टिपल्या गेल्याचे समजते.