नवी दिल्ली – जीएसटीच्या अंमलबजावणीवरून मोदी सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असताना अर्थव्यवस्थेवर जीएसटी लागू झाल्याने काय परिणाम होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काही अभ्यासकांनी जीएसटीमुळे विकासदरावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तविली होती. पण जीएसटी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय असल्याचे भारतातील जागतिक बँकेचे प्रमुख जुनैद अहमद यांनी म्हटले आहे. जीएसटीमुळे देशाच्या कररचनेत आमुलाग्र बदल झाला असून, या नव्या कराची अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर भारताचा विकासदर ८ टक्क्यांवर जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
जीएसटीमुळे भारताच्या कररचनेत आमुलाग्र बदल : जागतिक बँक
भारताचा विकासदर मार्च २०१७ला संपलेल्या आर्थिक वर्षात ७.१ टक्के एवढा नोंदवला गेल्यानंतर त्यामध्ये चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घट झाली आणि तो ५.७ टक्क्यांपर्यंत घसरला. विकासदरावर नोटाबंदीच्या निर्णयामुळेच परिणाम झाल्याची टीका सरकारवर करण्यात येते आहे. केंद्र सरकारने त्यातच धाडसी पाऊल टाकत १ जुलै २०१७ पासून देशभरात वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी केली. केंद्राचे आणि राज्यातील विविध कर या नव्या करामुळे संपुष्टात आले आहेत.
जागतिक बँकेचे भारतातील प्रमुख जुनैद अहमद या सर्व पार्श्वभूमीवर म्हणाले, ८ टक्क्यांनी भारताचा विकासदर वाढण्याची दाट शक्यता असून केंद्र सरकारने जीएसटीची अंमलबजावणी करून धाडसी पाऊल टाकले आहे. भारतात अंतर्गतपणे या पावलामुळे संपूर्ण देश एकच बाजारपेठ बनला आहे. या कराची अंमलबजावणी जर व्यवस्थितपणे झाली तर देशाच्या विकासदराला पुन्हा मोठी चालना मिळेल.