शिवसेना ठरतेय हास्यास्पद


महाराष्ट्रातल्या भाजपाच्या सरकारला शिवसेनेने पाठींबा दिला तेव्हापासून सेनेने कधीही युतीला आवश्यक अशी परिपक्वता दाखवलेली नाही. सातत्याने भाजपाला लक्ष्य करीत पण आपल्याच सरकारवर ताशेरे झाडायचे आणि मनातली मळमळ व्यक्त करीत रहायचे हाच शिवसेनेचा गेल्या तीन वर्षातला खाक्या राहिला आहे. अशा या वातावरणाला सेना नेते अधुन मधुन सरकारचा पाठींबा काढून घेण्याच्या वल्गनेची फोडणी द्यायलाही विसरत नाहीत पण ही वल्गना प्रत्येक वेळी फोल ठरते आणि शिवसेना हा लोकांच्या चेष्टेचा विषय होतो याची जाणीव सेनेच्या नेत्यांना नाही. आताही बाहेर पडण्याच्या वल्गना सुरूच आहेत.

शिवसेना दोन कारणांनी सरकारच्या बाहेर पडू शकत नाही. पहिले कारण म्हणजे सेनेने बाहेर पडण्याचा विचार जरी केला तरी शिवसेना फुटते. कारण शिवसेनेच्याच काही आमदारांना सरकार पडायला नको आहे. शिवसेनेतले याबाबतचे मतभेद नेहमीच प्रकट होत आले आहेत. दुसरे कारण म्हणजे शरद पवार. महाराष्ट्रातले भाजपाचे सरकार शिवसेनेचा पाठींबा काढून घेतल्याने अस्थिर झाले तर राष्ट्रवादी कॉंग्रेस हे सरकार वाचवण्यासाठी कोणत्याही क्षणी पुढे सरसावू शकते. तसे नेमकेपणाने होईल की नाही हे सांगता येत नाही पण तसे वातावरण तयार झाले आहे आणि ऐनवेळी शरद पवार फडणवीस यांच्या मागे उभे राहतील अशी चर्चा आहे. तिच्यामुळे शिवसेेनेने सरकारचा पाठींबा काढून घेतला तरी सरकार पडत नाही.

आपण सरकारला पाडू शकत नाही तर मग तशा वल्गना करून आपले हसे करून घ्यायला नको हे समजण्याइतकी परिपक्वता शिवसेनेच्या नेत्यांत नाही. त्यामुळे त्यांनी सरकार पाडण्याच्या कितीही धमक्या दिल्या तरीही सरकार चांगले तीन वर्षे टिकले आहे आणि अजून दोन वर्षे त्याला काही होत नाही याचीही खात्री झाली आहे. पण यात शिवसेनेची होरपळ होत आहे. सेनेला धड सत्ताधारी असल्याचे लाभ मिळत नाहीत आणि सरकारवर सातत्याने टीका करूनही धड विरोधी असल्याचाही काही फायदा होत नाही. अशा अधांतरी अवस्थेत आता शिवसेनेचे नेते आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांंनी विधानसभेतल्या शिवसेनेच्या जागा दुप्पट करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यांच्याकडे परिपक्वता असती तर हेही अशक्य नव्हते पण उथळपणा नडला आहे.

Leave a Comment