‘ट्राय’च्या निर्णयामुळे मोबाईल कॉल रेट होणार कमी!


नवी दिल्ली – दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मोबाईल इंटरकनेक्शन वापर शुल्क (आययूसी) कमी केल्यामुळे लवकरच फोन कॉलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. १४ पैशांवरून ते सहा पैसे प्रतिमिनिट करण्यात आले आहे. या कपातीचा लाभ ग्राहकांना मोबाईल कंपन्यांनी दिल्यास कॉल दर कमी होतील. पोस्टपेड ग्राहकांना याचा सर्वाधिक लाभ होणार आहे.

मोबाईल ते मोबाईल टर्मिनेशन शुल्क प्रतिमिनिट १४ पैशांवरून ६ पैसे करण्यात आले आहे. या निर्णयाची १ ऑक्टोबर २०१७ पासून प्रभावीपणे अंमलबजावणी होईल. यासह इतर सर्व प्रकारच्या कॉलवरील (वायर-लाईन टू मोबाईल, वायर-लाईन टू वायर-लाईन) टर्मिनेशन शुल्क आकारणी १ जानेवारी २०२० पासून पूर्णपणे बंद करण्यात येईल, अशी माहिती ‘ट्राय’ने दिली आहे.

एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर आदी कंपन्यांसाठी ‘ट्राय’चा हा निर्णय मोठा झटका मानला जातो. या कंपन्यांनी इंटरकनेक्ट वापर शुल्क दुप्पट म्हणजेच ३० पैसे प्रतिमिनिट करण्यात यावा, अशी मागणी केली होती. तर रिलायन्स जिओला या निर्णयाचा फायदा अधिक होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

Leave a Comment