कसा असावा नवरात्री दरम्यान आहार?


नवरात्रीचे पर्व आता सुरु होत आहे. संपूर्ण नऊ दिवसांच्या या सणामध्ये अनेक जण उपवास करीत असतात. शरीराची आणि मनाची अंतर्बाह्य शुद्धी हे या उपवासांच्या मागचे उद्दिष्ट असते. वर्षभर आहारामध्ये असलेल्या असंतुलानाने आपल्या शरीरावर चांगले वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आहारावर पूर्णतः नियंत्रण ठेऊन शरीरशुद्धी करणे हा या उपवासांच्या मागचा हेतू असतो.

नवरात्रीच्या आधी हवामान आणि ऋतू ही बदलत असतात. या काळामध्ये आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते, तसेच पाचनक्रियाही काही अंशी शिथिल होते. याच कारणांसाठी या काळामध्ये उपवास करण्याची प्रथा आपल्याकडे फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. या उपवासाच्या दिवसांमध्ये मांसाहार, प्रोसेस्ड अन्नपदार्थ, ग्लुटेन युक्त पदार्थ खाल्ले जात नाहीत. हे सर्व पदार्थ पचण्यास जड असतात. उपवास करीत असल्याने ह्या पदार्थांचे सेवन आपोआपच टाळले जाते. उपवासाच्या पदार्थांमध्ये कुट्टूचे पीठ ही समाविष्ट आहे. मखाने बनविले जात असताना जे मखाने फुलत नाहीत ते दळून त्यापासून हे कुट्टू चे पीठ तयार केले जाते. कुट्टू चे पीठ उपवसामध्ये सेवन करण्यासाठी चांगले. यामध्ये शरीरास आवश्यक प्रथिने मुबलक मात्रेमध्ये असून फायबरची मात्राही भरपूर आहे. शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकण्याच्या कामी कुट्टू चे पीठ अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये रीबोफ्लावीन, नियासिन ही जीवनसत्वे असून हे सर्वथा ग्लुटेन फ्री आहे.

उपवास करीत असताना आपला आहार सात्विक असावा. यामध्ये फळे, दुध आणि भाज्यांचा समावेश असावा. या प्रकारच्या आहारामुळे आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जाण्यास मदत मिळेल. उपवासाच्या काळादरम्यान अॅसिडीटी होऊ नये यासाठी आपल्या भोजनाच्या वेळेमध्ये योग्य अंतर ठेवावे. एका दिवसामध्ये केवळ दोन वेळा न जेवता, तेच अन्न थोड्या थोड्या वेळाने दिवसभरात अनेकदा सेवन करावे. त्यामुळे खूप वेळ पोट रिकामे राहणार नाही, व अॅसिडीटीचा त्रासही जाणवणार नाही.

उपवासादरम्यान पाणी भरपूर पिणे आवश्यक आहे. या काळामध्ये आपला आहार अगदी नियंत्रित असतो. तेव्हा शरीरामध्ये पाण्याची योग्य मात्रा असणे आवश्यक आहे. अन्यथा डीहायड्रेशन होऊ शकते. तसेच उपवासाच्या काळामध्ये तेलकट पदार्थ टाळावे. बटाटा किंवा रताळ्या सारख्या भाज्या तळून खाण्यापेक्षा ओव्हनमध्ये भाजून किंवा कुकरमध्ये उकडून घेऊन खाव्या. तसेच गोड पदार्थांमध्ये साखरेऐवजी गूळ वापरावा. उपवासाच्या काळामध्ये जर बाहेर जेवायचा प्रसंग आला ‘ नवरात्री स्पेशल थाळी ‘ टाळून दही, साबुदाण्याची खिचडी, ताक अश्या पदार्थांचे सेवन करावे. बाहेर पडताना आपल्याबरोबर एखादे फळ व पिण्यासाठी पाणी जरूर ठेवावे.

Leave a Comment