गोवा सरकारच्या नियमामुळे पर्यटकांच्या उत्साहावर पडणार विरजण


गोवा राज्यामधील सार्वजनिक स्थानांवर आता मद्यप्राशनास बंदी घालण्यात येणार आहे, अशी घोषणा नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली आहे. याबाबतची सरकारी अधिसूचना पुढील महिन्यात लागू करण्यात येणार असल्याचे ही पर्रीकर यांनी सांगितले. पुढील पंधरा दिवसांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन त्यांना या निर्णयाबद्दल पूर्ण कल्पना दिली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

या नवीन नियमाप्रमाणे, जर कोणाला मद्यप्राशन करायचेच असेल तर ते सार्वजनिक ठिकाणी करता येणार नसून, घराच्या किंवा हॉटेलच्या आतच करता येईल. मद्यविक्री करणाऱ्या दुकानांच्या आसपास जर मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्ती आढळल्या, तर मद्यविक्री करणाऱ्या त्या दुकानावर बंदी घालून त्त्याचा परवानाही रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे बेजबाबदारपणे मद्यप्राशन करणाऱ्या नागरिकांच्या कर्मांची फळे मद्यविक्री करणाऱ्या दुकानांनाही भोगावी लागणार आहेत.

मागील वर्षी गोव्यामध्ये काही ठिकाणी ‘नो अल्कोहोल कन्झम्प्शन झोन‘ स्थापित करून त्या ठिकाणांवर मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्तींना दंड आकारला जात असे. पण आता या नवीन नियमाची अंमलबजावणी झाल्यानंतर सर्वच सार्वजनिक स्थानांवर मद्यप्राशन करण्यास बंदी करण्यात येणार आहे. या नियमाच्या अंमलबजावणीस काही महिने आधीपासूनच सुरुवात झाली असून, सार्वजनिक स्थानांवर मद्यप्राशन करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

या नवीन नियमामुळे पर्यटकांच्या उत्साहावर विरजण पडणार असले तरी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून बेभान होणाऱ्या व्यक्तींच्या स्वैराचारी वर्तनावर नियंत्रण ठेवता येणे शक्य होणार आहे.

Leave a Comment