‘रेगुलुस’ताऱ्यामुळे नोबेल विजेत्या भारतीय शास्त्रज्ञाच्या सिद्धांताला दुजोरा


नोबेल विजेते भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी 70 वर्षांपूर्वी मांडलेल्या सिद्धांताला ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या नवीन संशोधनामुळे दुजोरा मिळाला आहे. वेगाने फिरणारे तारे ध्रुवीय प्रकाश उत्सर्जित करतील, असा सिद्धांत चंद्रशेखर यांनी मांडला होता.

ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स यूनिव्हर्सिटी (यूएनएसडब्ल्यू) आणि ब्रिटनमधील स्थित यूनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. नेचर अॅस्ट्रोनॉमी नावाच्या प्रतिष्ठित नियतकालिकात ते प्रसिद्ध झाले आहे.

या शास्त्रज्ञांनी रेगुलुस नावाच्या ताऱ्यातून निघणाऱ्या ध्रुवीय प्रकाशाची ओळख पटविण्यासाठी अत्यंत संवेदनशील उपकरण वापरले. रेगुलुस तारा हा रात्री आकाशात सर्वाधिक प्रखर चमकणाऱ्या ताऱ्यांपैकी एक आहे. या उपकरणाच्या मदतीने या ताऱ्याशी संबंधित आधी उपलब्ध नसणारी मोठ्या प्रमाणावरील माहिती मिळाली.

‘‘हा तारा 320 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने फिरत आहे,’’ असे यूएनएसडब्ल्यूचे शास्त्रज्ञ डॅनियल कॉटन यांनी सांगितले.

चंद्रशेखर यांनी 1946 साली ताऱ्यांच्या परीघावरून निघणाऱ्या ध्रवीय प्रकाशाच्या उत्सर्जनाची भविष्यवाणी केली होती. त्यातूनच स्टेलर पोलरीमीटर यासारख्या संवेदनशील उपकरणांचा विकास शक्य झाला. त्यातूनच चंद्रशेखर यांच्या सिद्धांताला दुजोरा मिळाला आहे.

Leave a Comment