आणखी दोन समाजवादी पार्ट्या


भारतातले डावे विचारवंत म्हणवणारे कधीही एका आवाजात बोलत नाहीत. पूर्वीपासून त्यांना फुटीचा शाप लागलेला आहे. एकाच पक्षात राहून काम करायचे म्हटले की काही बाबतीत मतभेद होणे साहजिक आहे पण समाजवादी मंडळींची खोड अशी की किरकोळ मतभेदापायी ते पक्ष फोडायला मागेपुढे पाहणार नाहीत. म्हणून जनता पार्टीत आलेले समाजवादी आता किमान २० ते २५ पक्षात विखुरलेले आहेत. आता येत्या सात आठ दिवसात समाजवादी नेत्यांचे आणखी दोन नवे पक्ष स्थापन होणार आहेत. त्यातला एक पक्ष शरद यादव यांचा असेल तर दुसरा पक्ष असेल मुलायमसिंग यादव यांचा.

शरद यादव जनता दल (यू) या पक्षात फूट पाडून नवी राहुटी ठोकणार आहेत तर मुलायमसिंग यादव त्यांनीच स्थापलेल्या समाजवादी पार्टीत वेगळी चूल मांडणार आहेत. जनता दल (यू) हा पक्ष नितीशकुमार यांनी लालूंशी असलेली युती मोडून भाजपाशी हातमिळवणी केली म्हणून शरद यादव संतापले असून त्यांनी या मुद्यावरून नितीशकुमार यांना आव्हान दिले आहे. अशा पक्षात फूट पडते तेव्हा जो कोठे तरी सत्तेवर असतो तोच गट वर्चस्व निर्माण करतो आणि त्याचाच पक्ष खरा ठरतो. या न्यायाने नितीशकुमार यांचा गटच खरा जनता दल (यू) ठरणार आहे. पण शरद यादव यांनी त्यांना आव्हान दिले आहे. जनता दल(यू) पक्षाचे बहुसंख्य प्रदेश अध्यक्ष आपल्या बाजूने असल्यामुळे आपण आपलाच गट हा खरा पक्ष आहे हे सिद्ध करू शकू असे त्यांना वाटते पण मुळात हा पक्ष प्रामुख्याने बिहारातच प्रभावी आहे. इतर राज्यात नाममात्र शाखा आहेत तेव्हा नितीश कुमारच भारी ठरण्याची शक्यता आहे.

दुसर्‍या बाजूला समाजवादी पाटींत फूट पडत आहे. पक्षाचे संस्थापक मुलायमसिंग यादव आणि त्यांचे सुपुत्र अखिलेश यादव यांच्यात मतभेद निर्माण झाली आहे. या फुटीचा परिणाम म्हणून या पक्षाची नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वाताहत झाली. तरीही मुलायमसिंग यांनी पक्षात ऐक्य टिकावे यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांना अखिलेश यादव यांचा काही प्रतिसाद नाही. तांत्रिक बाबींवर अखिलेश यादव यांनी आपला गट हाच खरा पक्ष असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे मुलायम सिंग यादव यांना आपला गट वेगळा करून त्याला नवे नाव द्यावे लागणार आहे. समाजवादी सेक्युलर फ्रंट असे या नव्या पक्षाचे नाव असेल असे त्यांचे बंधू शिवप्रताप यादव यांनी जाहीर केले आहे.

Leave a Comment