नितीशकुमार यांचा सवाल


कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍यांचा शोध घेण्याबाबत कर्नाटक सरकार करीत असलेल्या चालढकलीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नाराजी व्यक्त केली असून कर्नाटकातले कॉंग्रेसचे सरकार का तपासाबाबत त्वरेने हालचाली करीत नाही अशी टीका केली आहे. नितीशकुमार यांची ही टीका मोठी बोलकी आहे कारण यातून आपल्या देशात अशा हत्यांवरून कसे राजकारण केले जाते हे दर्शविणारी आहे. गौरी लंकेश यांची हत्या होऊन आठवडा उलटला असला तरीही अजून कर्नाटकातल्या कॉंग्रेसच्या सरकारला आरोपींना अटक करण्यात यश आलेले नाही यावर नितीशकुमार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ही भावना व्यक्त करतानाच नितीशकुमार यांनी असाच प्रकार बिहारात घडला असता तर काय झाले असते असा सवाल केला आहे. खरेच बिहारमध्ये असे काही घडले असते तर सर्वांनी टीकेचा भडीमार केला असता आणि या प्रकाराला बिहार सरकारला जबाबदार धरले असते. माध्यमांनीही आरोपी सापडत नाहीत म्हणून गोंधळ घातला असता. पण आता या लंकेश प्रकारात तपासाची जबाबदारी कोणत्याही भाजपा सरकारची नाही म्हणून माध्यमांनीही आरोेपी सापडत नसूनही चुप्पी साधली आहे. म्हणजे एखाद्या हत्येला भाजपा सरकार जबाबदार असले तर गोंंधळ घालायचा आणि कॉंग्रेस सरकार जबाबदार असेल तर मौन बाळगायचे अशी माध्यमांची दुहेरी नीती आहे. तिलाही नितीशकुमार यांनी उघडे पाडले आहे.

महाराष्ट्रात डॉ. नरेन्द्र दाभोळकर आणि कॉं. गोविंद पानसरे यांच्या हत्या झाल्या तेव्हा असाच प्रकार घडला. खरे तर डॉ. दाभोळकर यांची हत्या झाली तेव्हा राज्यात कॉंग्रेसचे सरकार होते. या हत्येनंतर हे सरकार वर्षभर सत्तेवर होते पण कोणाही डाव्या संघटनेने सरकारला जबाबदार धरले नाही. नंतर पानसरे यांची हत्या झाली तेव्हा भाजपाचे सरकार सत्तेवर होते. पण तेव्हा मात्र काही विशिष्ट लोकांनी ढांेंगीपणाची कमाल करीत सरकारला धारेवर धरले. एवढेच नाहीतर पुरस्कार वापसीचेही तद्दन दुटप्पीपणाचे नाटक केले. एवढेच नाही तर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी केन्द्र सरकारवरची नसतानाही मोदींवर आगपाखड केली. तसे तर मग डॉ. दाभोळकरांच्या हत्येबाबत मनमोहन सिंग यांना जबाबदार धरायला हवे होते कारण त्यांची हत्या झाली तेव्हा तेच सरकार सत्तेवर होते पण या सगळ्या हत्यांच्या वेळी हे सारे डावे विचारवंत मोठ्याच ढोंगीपणाने वागत असतात.

Leave a Comment