नवी दिल्ली – अल्प किमतीत ४जी फिचर फोन रिलायन्स जिओने दाखल केल्यानंतर या क्षेत्रातील एअरटेल आणि आयडिया-व्होडाफोन या कंपन्यांनी ४जी फिचर फोन दाखल करण्याची घोषणा केली आहे. पण त्यांनी आतापर्यंत याविषयी कोणतेही भाष्य केले नाही. पण आता सरकारी मालकीची बीएसएनएल कंपनी २ हजार रुपयांच्या आसपास किंमत असणारा फोन आणणार आहे.
२ हजार रुपयांचा फोन आणणार बीएसएनएल
सध्या कंपनीकडून नवीन फोन बाजारात उतरण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला. हा फोन साधारण महिन्याभरात बाजारात उतरण्यात येईल. अनेक उत्पादन कंपन्यांनी यासाठी पुढाकार घेतला असल्याचे बीएसएनएलचे प्रमुख अनुपम श्रीवास्तव यांनी म्हटले. बीएसएनएलबरोबर भागीदारी करण्यास मायक्रोमॅक्स आणि लावा यासारख्या भारतीय स्मार्टफोन कंपन्या इच्छुक आहेत. बीएसएनएलकडून व्हॉईस पॅक आणण्यात येणार आहे. ओप्पो, शाओमी आणि विवो यासारख्या चिनी स्मार्टफोन कंपन्यांमुळे भारतातील घटता हिस्सा पुन्हा मिळविण्यासाठी भारतीय कंपन्यांना मदत होईल.
मात्र या फोनमध्ये कोणत्या सुविधा असतील याची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. हा फोन ४जी वापरासाठी सज्ज असेल का, हे समजले नाही. बीएसएनएलचा ग्रामीण भागात दरारा कायम असल्याने येथील फोन वापरणाऱयांच्या संख्येत वाढ होईल. कंपनीकडून हा फोन दिवाळीपूर्वी बाजारात आणण्यात येईल असे सुत्रांनी सांगितले.