देशाच्या पाच बड्या धरणांच्या कथा


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवशी म्हणजे १७ सप्टेंबरला देशातील अति महत्त्वाचे व दीर्घ काळ काम सुरू असलेले सरदार सरोवर धरणाचे उद्धाटन, त्याचे लोकार्पण केले. जगातील पहिले सर्वात उंच धरण म्हणून त्याची ओळख आहे. मात्र भारतात हजारोंनी धरणे बांधलेली आहेत. त्यातील कांही मात्र अनेक कारणांनी वेगळी व प्रसिद्धही आहेत. त्यांची ही माहिती


पोंग डॅम- यालाच महाराणा प्रताप सागर असेही म्हटले जाते. हिमाचल प्रदेशाच्या कांगडा भागात बांधले गेलेले हे धरण बियास नदीवर आहे. मानव निर्मित जलाशय असलेल्या या धरणात एक मोठा सांस्कृतिक ठेवा दडला आहे. या धरण परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या जलाशयाची पातळी सतत खालीवर होत असते. उन्हाळ्यात जलाशयाची पातळी कमी झाली की धरणात बुडालेली मंदिरे दिसू लागतात. त्यांना बाथू मंदिरे असे म्हटले जाते. स्थानिक भाषेत त्यांना बाथू की लडी म्हणतात. ७० व्या दशकापासून ही मंदिरे धरण पाण्यात सामावली गेली आहेत.


हिराकुड- ओरिसा राज्यातील हे धरण सर्वाधिक लंाबीचे धरण असून त्याची लांबी आहे २६ किमी. संबळपूर जिल्ह्यात महानदीवर हे धरण बांधले गेले आहे. या धरणामुळे खूपच सुंदर सरोवर तयार झाले असून आज ते लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे.


भाक्रा नांगल- भूकंपप्रवण भागात बांधले गेलेले जगातील पहिले उंच गुरूत्वीय धरण आहे. हिमाचलच्या विलासपूर जिल्ह्यत सतलज नदीवर हे धरण म्हणजे प्रत्यक्षात भाक्रा व नांगल अशी दोन धरणे आहेत. त्याची उंची ७४० फूट आहे. हिमाचल व पंजाब सीमेवर हे धरण आहे.


टिहरी- हिमालयातील भागीरथी आणि भीलांगणा या दोन नद्यांच्या संगमावर बांधले गेलेले हे धरण देशातील सर्वात उंच धरण आहे.जगातील हे दोन नंबरचे उंच धरण असून त्याची उंची आहे २६०.५ मीटर म्हणजे सुमारे ८०० फूट. जगातील हे ८ नंबरचे मोठे धरण आहे.


मेथॉन बांध- झारखंड राज्यातील धनबाद पासून ५२ किमीवर असलेल्या मेथॉन मध्ये हे धरण आहे. दामोदर खोरे कार्पोरेशन ने बांधलेल्या या धरणाचा जलाशय सर्वात मोठा आहेच पण येथे भूमिगत पॉवर स्टेशन आहे. पूर्ण दक्षिण पूर्व आशियात अशा प्रकारचे हे एकमेव धरण आहे.

Leave a Comment