मंकी मॅनला लांघायची आहे बुर्ज खलिफा - Majha Paper

मंकी मॅनला लांघायची आहे बुर्ज खलिफा


मोठ मोठे पहाड, उंच भिंती, इमारती कोणत्याही कृत्रिम वा मदतकारी साधनांविना सहजी चढून जाणार्‍या ज्योती राज या तरूणाला आता दुबईतील बुर्ज खलिफा ही अतिप्रचंड इमारत चढून जाण्याची इच्छा आहे. भिंतीवर उलटे लटकून शरीर ९० डिग्रीमध्ये आणणार्‍या ज्योती राजला मंकी मॅन या नावानेही ओळखले जाते.

त्याच्या या अनोख्या छंदाची सुरवात अपघाताने व नैराश्यातून झाली आहे. म्हणजे आयुष्यात नैराश्य आल्याने तो एका उंच खडकावर जाऊन तेथून उडी मारून जीव देणार होता. पण हा प्रचंड खडक चढायचा कसा हेच त्याला कळत नव्हते. इतक्यात एक माकड आले व ते हा खडक चढायला लागले तेव्हा कोणताही विचार न करता ज्योती त्याच्यामागून गेला व थेट खडकावर जाऊनच थांबला. तो पर्यंत खाली जमा झालेल्या लोकांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले व निराश झालेल्या ज्योतीचा आत्मविश्वास एकदमच बळावला. त्यानंतर त्याला हा छंद जडला.

देशातील दोन नंबर उंचीचा मानला गेलेला ८३० फूट उंचीचा जोग फॉल्स कसलीही मदत अथवा सेफ्टी गिअर्स न वापरता ज्योतीने पादाक्रांत करून रेकॉर्ड नोंदविले आहे. कोणत्याही उंच भिंती, इमारतींवर तो सहज चढून जातो. या प्रयत्नात त्याची २० हाडे तुटली आहेत व त्याच्या शरीरात चार रॉड घातले गेले आहेत. ज्योती म्हणतो, माझी हाडे भलेही तुटली असतील पण मी हृदयभंग होऊ दिलेला नाही. माझ्या हातांच्या पकडीवर माझा पूर्ण भरवसा आहे व दुबईची बुर्ज खलिफा लांघाण्याचे स्वप्न मी पाहतो आहे.

Leave a Comment