बंगालमध्येच प्रामुख्याने आढळणारा रॉयल बंगाल टायगर म्हणजे आपला पट्टेरी वाघ बंगालबाहेर कुठे पाहायचा असेल तर त्यासाठी नागार्जुन सागर श्रीशैलम टायगर अभयारण्याला जरूर भेट द्यायला हवी. आंध्रातील पाच जिल्ह्यात पसरलेले हे अभयारण्य पर्यटकांना जंगल सफारीबरोबच धार्मिक पर्यटनाचा आनंद देऊ शकते कारण येथून जवळच नालामाल पहाडावर १२ ज्योतिर्लिंग व आठ शक्तीपीठातील एक असे मल्लिकार्जुन श्रीशैलम महादेव व देवी भररामम्बा यांचे मंदिरही आहे.
जंगलसफारीबरोबर धार्मिक पर्यटनाचा आनंद
मलिक्कार्जुन महादेव मंदिरात भाविक वर्षभर येत असतात व हे स्थान अतिशय मनोरम्य आहे. अतिशय प्राचीन अशा या मंदिराला आपल्या शिवाजी महाराजांनीही भेट दिली होती असे संदर्भ सापडतात. प्रचंड आवारात पसरलेले हे मंदिर स्थापत्यशैलीचा सुंदर नमुना मानले जाते. जवळच असलेल्या नागार्जुनसागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्पाची व्याप्ती ३५६८ चौरस किलोमीटर परिसरात असून त्यातील १२०० चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित आहे.
नालगोंडा, महबूबनगर, कर्नुल, प्रकाशम व गुंटूर या आंध्रप्रदेशातील पाच जिल्हे या अभयारण्याशी जोडलेले आहेत. स्वातंत्र्यानंतर हे अभयारण्य राज्य शासनाकडे आले तेव्हा शिकारीच्या आनंदासाठी त्याचा विकास केला गेला. १९८३ मध्ये येथे फक्त ४० वाघ उरले होते. त्यानंतर मात्र अवैध शिकारीवर बंदी आणून येथे व्याघ्र प्रकल्पाची सुरवात केली गेली. गतवर्षी येथील वाघांची संख्या ११० वर गेली आहे. वाघाबरोबरच येथे जंगलातील अन्य वन्य प्राणीही सहज पाहता येतात. नशीब फारच जोरावर असेल तर वाघ शिकार करतानाचे दृष्य ही अनुभवता येते.