पाण्याच्या भावात पेट्रोल विकणारे देश


भारतात आज पेट्रोल च्या किमतींनी ८० चा आकडा पार केल्याने सरकारवर जोरदार टीका सुरू आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले की सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात व त्याचा फटका पर्यायाने मध्यमवर्गीयांना बसत असतो हे आपण जाणतो. पेट्रोलला जीएसटी खाली आणले तर पेट्रोलचे दर ३२रूपये लिटरपर्यंत येतील असेही अंदाज वर्तविले जात आहेत. भारतात बाटलीबंद पाण्याची किंमत ही २० रूपयांच्या दरम्यान आहे. जगभरात कांही देश असेही आहेत जेथे पेट्रोल पाण्याच्या भावात विकले जाते. त्याच देशांची ही माहिती


जगात सर्वात कमी दरात म्हणजे जवळजवळ फुकटच पेट्रोल विकणारा देश आहे व्हेनेझुएला. आर्थिक अडचणी आणि राजकारणातील उलथापालथीमुळे डबघाईला आलेल्या या देशात पेट्रोलचा दर आहे लिटरला अवघे ६४ पैसे. जगात इतक्या कमी दरात पेट्रोल कुठेच विकले जात नाही.


सौदी हा तर कच्च्या तेलाचे प्रचंड साठे असलेला व त्याचे प्रचंड प्रमाणात उत्पादन करणारा देश. जगातील १० नंबरचा श्रीमंत देश अशीही याची ओळख. पिकते तेथे विकत नाही ही म्हण सार्थ करणार्‍या या देशात पेट्रोलचा दर आहे लिटरला १५ रूपये. ९५ टक्के वाळवंट असलेल्या या देशात एकही नदी अथवा सरोवर नाही. त्यामुळे समुद्राचेच पाणी शुद्ध करून पिण्यासाठी वापरले जाते. येथे पेट्रोल पेक्षा पाणी महाग पडते.


तुर्कमेनिस्तान हा देश एकेकाळी सोविएट संघातला देश. भारताच्या छोट्या राज्याएवढी याची लोकसंख्या.मध्य आशियातील या देशात प्रचंड प्रमाणात तेलसाठे असून तेल व गॅस हेच त्यांचे उर्जेचे मुख्य साधन आहे. येथे पेट्रोलचा दर आहे लिटरला १८ रूपये ५८ पैसे.


अल्जिरिया हा आकाराने जगातील दहा नंबरचा मोठा देश असून पूर्वी हाच भाग नॉर्मेडिया म्हणून ओळखला जात होता. या देशाचा ८० ते ९० टक्के भाग सहारा वाळवंटाचा आहे. येथे पेट्रोलचा भाव आहे लिटरला २० रूपये ५१ पैसे


कुवेत- जगातील चार नंबरचा श्रीमंत देश. जगात प्रचंड तेलसाठे असलेल्या देशात याचा पाचवा नंबर आहे. १९३० मध्ये येथे पेट्रोल असल्याचे समजले व १९६१ पर्यंत येथे कच्चे तेल काढण्याच्या उद्योगात प्रचंड वाढ झाली. या देशातील ९५ टक्के खनिज तेल निर्यात होते व सरकारी महसूलाचा ८५ टक्के वाटा हे खनिज तेल व तेल उत्पादनातून मिळतो. येथे पेट्रोल २२ रूपये लिटरने विकले जाते.

Leave a Comment