अठ्ठावन्न वर्षांचे झाले दूरदर्शन


यंदाच्या वर्षी दूरदर्शनला अठ्ठावन्न वर्षे पूर्ण होत आहेत. आताच्या काळातील नवनवीन चॅनल्सच्या भाऊगर्दीत दूरदर्शन थोडे हरविल्यासारखे झालेले असले तरी एके काळी दूरदर्शन सर्वच टीव्ही प्रेक्षकांची जीवनरेखा असे. दूरदर्शन वर दाखविले जाणारे काही कार्यक्रम पाहण्यासाठी लोक इतके आतुर असत की त्या कार्यक्रमाच्या वेळी रस्त्यावरची रहदारीही अगदी कमी होऊन जाई. दूरदर्शन म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर रंगोली, छायागीत, चित्रहार, रामायण, महाभारत, सुरभी, हम लोग, बुनियाद या सर्व प्रचंड लोकप्रिय झालेल्या मालिका उभ्या राहतात. या सर्व अविस्मरणीय मालिका प्रेक्षकांच्या समोर प्रस्तुत करणाऱ्या दूरदर्शन ची सुरुवात १९६५ साली एका छोट्या ट्रांझिस्टरच्या मार्फत एका छोटेखानी स्टुडियो मध्ये झाली. दूरदर्शन सुरुवातीला ऑल इंडिया रेडीओचाच भाग असल्याने त्या काळी प्रसारित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचे काम ऑल इंडिया रेडियो मार्फतच पाहिले जात असे.

काही काळानंतर दूरदर्शन ने स्वतःच्या स्टुडीयोचे निर्माण केले आणि कार्यक्रमांच्या राष्ट्रीय प्रसारणाला सुरुवात झाली. हे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या वाहिनीला डीडी १ असे नाव देण्यात आले. कृषी दर्शन, चौपाल, समाचार, कल्याणी हे कार्यक्रम डीडी १ या वाहिनीवरून सर्वप्रथम प्रसारित करण्यात आले. त्यानंतर १९८२ सालापर्यंत दूरदर्शन राष्ट्रीय प्रसारण केंद्र म्हणून नावारूपाला आले. १९८४ साली दूरदर्शन वरील पहिली मालिका ‘ हम लोग’ प्रसारित झाली. ही मालिका थोड्या अवधीतच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली. १९८६ ते १९८७ या काळामध्ये ‘ नुक्कड ‘ आणि ‘ मालगुडी डेज ‘ या मालिका प्रसारित केल्या जाऊ लागल्या आणि लवकरच त्या लोकप्रिय ही झाल्या. १९८७ ते १९९० च्या दरम्यान प्रसारित केल्या गेलेल्या बी आर चोप्रा यांच्या ‘ महाभारत ‘ या मालिकेने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. त्याचप्रमाणे ‘रामायण’, ‘सर्कस’ या मालिका देखील त्या काळातील लोकप्रिय मालिका ठरल्या.

Leave a Comment