दगडांची अंडी देणारा खडक


निसर्ग ही रहस्यांची खाण आहे. वैज्ञानिकांनी निसर्गाची अनेक रहस्ये उलगडली आहेत मात्र आजही अनेक रहस्ये उलगडली गेलेली नाहीत. निसर्गातील प्रत्येक गोष्टच खरे तर नवलाची. प्रत्येक चमत्कारामागे विज्ञान असतेच असे मान्य केले तरीही कांही निसर्गाची कांही रहस्ये विज्ञानालाही समजलेली नाहीत. चीनच्या कियान्नान बुयेई मियाओ भागात असाच एक खडक चमत्कार बनून राहिला आहे. २० मीटर लांब व ६ मीटर उंचीचा हा खडक दर ३० वर्षांनी दगडाची अंडी बाहेर टाकतो.

या खडकात सुरवातीला कांही उंचवटे येतात व हळूहळू त्यातून लांबट गोल अंड्याच्या आकाराचे दगड तयार होतात.३० वर्षांनंतर ते आपोआप गळून खाली पडतात. यांना चानडान असे म्हटले जाते. चानडान याचा अर्थ अंडे देणारा खडक असा आहे. हे गोळे कधीकधी ३०० किलेा वजनाचेही असतात. त्यांच्या व्यास ३० ते ६० सेंमीचा असतो. चीनी लोक यांना शुभ मानतात व घरी नेतात. त्यामुळे सरकारने आता अशी ७० दगडी अंडी संरक्षित केली आहेत.


चिनी वैज्ञानिकांच्या मते पूर्वी येथे समुद्र होता कालांतराने त्यातून हा खडक वर उचलला गेला. या खडकात कॅल्शियम कार्बोनेट खूप प्रमाणात आहे व त्याच्याच कणांपासून ही गोल दगडी अंडी बनतात. मात्र ती ३० वर्षांत एकदाच का बाहेर पडतात व या दगडांचा आकार अंड्यासारखाच का असतो याची उत्तरे मिळालेली नाहीत.

Leave a Comment