आयफेल टॉवर मधील गुप्त अपार्टमेंट


पॅरिस शहर हे पूर्वी एक रोमन शहर असून ‘ल्युतेशिया’ या नावाने ओळखले जात असे. हे शहर ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकामध्ये वसविले गेले. प्रणयाचे, प्रेमाचे प्रतीक असलेल्या पॅरिस शहराचा उल्लेख, ‘ सिटी ऑफ लाइट्स ‘, म्हणजेच दिव्यांच्या झगमगाटाने नटलेली नगरी, असाही केला जातो, कारण समस्त युरोपीय देशांमध्ये गॅस वर चालणारे दिवे सर्वप्रथम पॅरिस मध्ये अस्तित्वात आले. पॅरिस मध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यापैकी महत्वाचे आकर्षण म्हणजे जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले आयफेल टॉवर. जगभरातून दरवर्षी जवळजवळ ६.९ मिलियन पर्यटक आयफेल टॉवर बघण्यासाठी येत असतात. आयफेल टॉवरचे निर्माण गुस्ताव आयफेल यांनी तयार केलेल्या डिझाईन प्रमाणे करण्यात आले आहे, हे सर्वश्रुत आहे, पण गुस्ताव आयफेल यांनी आयफेल टॉवर च्या वर स्वतःसाठी एक लहानसे अपार्टमेंट बनवविले, ही माहिती तितकीशी प्रसिद्ध नाही. या अपार्टमेंटमधून गुस्ताव यांना १८९० च्या दशकामधील पॅरिस, एक हजार फुटांच्या उंचीवरून पाहता येत असे. हे अपार्टमेंट लहानसेच जरी असले तरी गुस्ताव यांच्यासाठी पुरेसे आरामदायी होते.

आयफेल टॉवरचे निर्माण करण्यासाठी अठरा हजार वेगवेगळ्या आकारांचे पोलादी खांब आयफेल यांच्या कारखान्यात तयार करण्यात आले. ते खांब एकमेकांशी जोडण्याकरिता २.५ मिलियन स्क्रू तयार करण्यात आले. ७३०० टन इतके भारीभरकम वजन असणाऱ्या ह्या लोखंडी टॉवर ला रंगविण्यासाठी साठ टन रंग वापरण्यात आला. आयफेल टॉवर तयार करण्यात इतकी सामग्री खर्च झाली असली तरी टॉवरच्या तिसऱ्या लेव्हल वर असणारे गुस्ताव यांचे अपार्टमेंट मात्र लहान आणि साधेसेच होते. या अपार्टमेंटच्या भिंती गुस्ताव यांनी सुंदर वॉलपेपरने सजविल्या. तसेच या अपार्टमेंटमध्ये गुस्ताव यांच्या संग्रही असलेली अनेक तैलचित्रे, आणि एक भव्य पियानो होता. अनेक उच्चभ्रू व्यक्तींनी त्या काळी आयफेल यांना, त्यांचे टॉवर वरील अपार्टमेंट भाड्याने देण्याची विनंती केली व त्याकरिता आयफेल यांना भरपूर पैसेही देऊ केले. पण आयफेल यांनी सर्व विनंत्या धुडकावून लावल्या. याच अपार्टमेंटमध्ये आयफेल यांच्या थॉमस एडिसन आणि त्यांच्या सम अनेक गुणवान व्यक्तींशी स्नेह्भेटी घडल्या.

१९२३ साली गुस्ताव यांचा मृत्यू झाला, त्यानंतर हे अपार्टमेंट बंद केले गेले, अनेक वर्षे हे अपार्टमेंट बंद राहिल्यानंतर अखेरीस २०१५ साली ते पर्यटकांकरिता खुले करण्यात आले. आता पर्यटकांना हे अपार्टमेंट पाहता येते. गुस्ताव यांच्या संग्रही असलेल्या सर्व वस्तू या अपार्टमेंटमध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या अपार्टमेंटमध्ये राहण्याची परवानगी आजही कोणालाही नाही.

Leave a Comment