खिशातून नेता येणारा व्हेंटीलेटर तयार


जगातील सर्वात छोटा व स्वस्त पोर्टेबल व्हेंटीलेटर ए सेट रोबोटिक्सचे प्रमुख व युवा वैज्ञानिक दिवाकर वैश्य यांनी तयार केला आहे. एम्समध्ये भरलेल्या वैद्यकीय तंत्रज्ञान परिषदेत तो मंगळवारी सादर करण्यात आला. मोबाईल अॅपसवर चालू शकणार्‍या या व्हेंटीलेटरला ऑक्सिजनची आवश्यकता नाही तसेच तो खिशातून सहज नेता येतो ही त्याची वैशिष्ठे आहेत. या प्रकारचा जगातला हा पहिलाच व्हेंटीलेटर आहे. या व्हेंटीलेटरच्या पेटंटसाठी अर्ज केला गेला असल्याचे समजते. या व्हेंटीलेटरची किंमत १५ ते २० हजार रूपयांच्या दरम्यान आहे.

सर्वसामान्य व्हेंटीलेटर बरेच मोठे असतात तसेच त्यांना अनेक उपकरणे जोडलेली असतात. तसेच त्याचा वापर करण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टरांची गरज असते. वैश्य यांनी तयार केलेल्या व्हेंटीलेटरचा वापर करण्यासाठी तज्ञ डॉक्टरची गरज नाही कारण तो वापरण्यासाठी अतिशय सोपा आहे व घरातही तो वापरता येतो. त्यासाठी रूग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. या व्हेंटीलेटरवरून संकटकाळात मेसेजही पाठविता येतात. त्यावर संभावित समस्येची माहिती देण्यासाठी दोन ऑनबोर्ड लाईटस आहेत. या द्वारे मेसेज देता येतात तसेच यात दोन संगणकही आहेत. त्यातील एक कांही कारणाने बंद पडला तर दुसर्‍याचा वापर करता येतो. ऐनवेळी कृत्रिम श्वासोश्वास देता येत नसल्याने जीव जाण्याचा धोका निर्माण झाला असेल तर याचा उपयोग होऊ शकतो तसेच जे अनेक वर्षे रूग्णालयात व्हेंटीलेटरवर आहेत, त्याना घरीही याचा उपयोग करता येतो. ग्रामीण भागात यांचा चांगला उपयोग होऊ शकेल असा दावा वैश्य यांनी केला आहे.

Leave a Comment