Skip links

अहमदाबादच्या चौका-चौकात आबे-मोदींचे बॅनर्स


अहमदाबाद – आजपासून दोन दिवसांसाठी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारताच्या दौऱ्यावर असून शिंजो आबे सर्वप्रथम गुजरातला भेट देणार असून, तेथे बुलेट ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत. अहमदाबादमध्ये भारत-जपान वार्षिक शिखर संमेलनाचे आयोजन केले असून, उभय देशांत या संमेलनादरम्यान महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे.

अहमदाबाद शहराचे आबे यांच्या स्वागतासाठी सुशोभिकरण करण्यात आले असून, साबरमती नदीचा समोरील भाग आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे. ज्या ठिकाणाहून आबे प्रवास करणार आहेत. त्या ठिकाणची डागडुजी करण्यात आली आहे. शिवाय, स्वच्छतेबाबत काळजी घेण्यात आली आहे. चौका-चौकात मोदी आणि आबे यांचे एकत्र बॅनर्स उभे केले आहेत. तर एक बॅनरवर ‘वेलकम टू इंडिया’ असे लिहिण्यात आले आणि खाली त्याचे जपानी भाषेत भाषांतर करण्यात आले आहे.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादमध्ये रोड शो करणार आहेत. या रोड शोचे आज आयोजन करण्यात आले आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळापासून ते साबरमती आश्रमापर्यंत हा रोड शो ८ किमी अंतराचा असणार आहे. साबरमती आश्रमात या रोड शोचा समारोप करण्यात येणार आहे. येथे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारत-जपान वार्षिक शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत. भारत आणि जपानचे पंतप्रधान हे पहिल्यांदाच एकत्र रोड शो करणार असून, त्यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती गुजरात भाजपचे अध्यक्ष जीतूभाई वाघाणी यांनी दिली आहे

Web Title: Shinzo Abe welcome banners in Ahmedabad