बंगळुरूमध्ये चिमुरडीवर शाळा सुरक्षा रक्षकाचा बलात्कार


बंगळुरू – दिल्लीत पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार व गुरुग्राममध्ये सात वर्षीय प्रद्युम्नच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच बंगळुरूमध्येही आता चार वर्षाच्या बालिकेवर शाळेतील सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

तेथील गार्डने एका खासगी स्कूलमध्ये एलकेजीमध्ये शिकणाऱ्या चार वर्षीय बालिकेला आपल्या वासनेची शिकार बनवले. आपल्या गुप्तांगात वेदना होत असल्याचे जेव्हा मुलीने पालकांना सांगितले, त्यावेळी गार्डचे हे घाणेरडे कृत्य समोर आले. बालिकेवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. पीडित बालिकेला उलट्या होऊ लागल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता ओळखून शाळेच्या सर्वच सुरक्षा रक्षकांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सांगितले, की पाचपैकी एका सुरक्षा रक्षकाने आपला गुन्हा कबूल केला आहे. बालिकेची प्रकृती पूर्णपणे सुधारल्यानंतर आरोपीची ओळख परेड घेतली जाईल. स्कूलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत व सुरक्षिततेची सर्व उपाययोजना करण्यात आली आहे. तरीही ही दुदैवी घटना घडली आहे.