संघर्ष चिघळला


तामिळनाडूतल्या सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाच्या कार्यकारिणीने अखेर अपेक्षेप्रमाणे शशिकला आणि त्यांचे पुतणे दिनकरन यांना पक्षातून बेदखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे होणारच होते कारण याच एका अटीवर पक्षातले दोन गट एकत्र आले होते. ज्या दिवशी या दोन गटांचे एकत्रीकरण जाहीर झाले त्याच दिवशी शशिकला यांच्या संबंधातला हा निर्णय होणार होता पण मुख्यमंत्री पलानीस्वामी हे अजून शशिकला यांच्या प्रभावातून पूर्ण मुक्त झाले नव्हते. शिवाय या दोन गटांनी कितीही उड्या मारल्या तरी शशिकला या अजूनही तुरुंंगात असूनही २१ आमदारांना आपल्या गटात राखून आहेत. म्हणजे त्यांना बेदखल केले तरीही सरकारच्या स्थैर्यावर परिणाम करण्याची ताकद त्या बाळगून आहेत या कडे पलानीस्वामी यांना दुर्लक्ष करून चालणार नाही.

पक्षाच्या कार्यकारिणीने काल घेतलेले काही निर्णय विचित्र वाटतात. पक्षाचे सरचिटणीसपद हे यापुढे कोणीही भूषवू शकणार नाही. ते पद जयललिता यांनी भूषविले होते. त्या आता हयात नाहीत त्यामुळे हे पद आता अन्य कोणाला मिळणार नाही. पक्षाची सूत्रे समन्वयक आणि सहसमन्वयक अशा दोन व्यक्तींच्या हातात असेल आणि हे दोघेच पक्षातल्या घडामोेडींविषयी काय तो निर्णय घेतील. जयललिता यांना देवपण देण्याचाही हा आटापिटा आहे. पण त्यामागे पलानीस्वामी यांच्या मनातला जयललिता यांच्याविषयीचा आदर आहे असे मानण्याचे काही कारण नाही. राज्यातली जनता जयललिता यांना मानते आणि अण्णाद्रमुक पक्षाचे दीड कोटी सदस्यही त्यांना देव मानते. त्या सदस्यांचा पाठींबा कायम टिकवायचा असेल तर जयललिता यांना असे एकमेवाद्वितीय स्थान देणे अपरिहार्य आहे म्हणून ते देण्यात आले आहे.

एकंदरीत तामिळनाडूत व्यक्तिपूजेचे पर्व अजूनही जारी आहे. त्याचा आधार घेऊन पक्षातले दोन्ही गट पक्षावर आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पलानीस्वामी यांच्या गटाने आपल्या हातात असलेल्या बहुमताचा वापर करून सध्या तरी आपले सरकार टिकवले आहे पण दिनकरण यांच्या प्रभावाखाली असलेले २१ आमदार काही गप्प बसणार नाहीत. विरोधी द्रमुक पक्षाचे नेतेही सार्‍या घटनांवर लक्ष ठेवून आहेत. भाजपाचा एकही आमदार तिथे नाही पण या घटनांवर भाजपाचे नियंत्रण आहे. कॉंग्रेसचे सध्या चार आमदार आहेत ते फार प्रभावी ठरणार नाहीत पण कॉंग्रेसचे बळ भाजपापेक्षा जास्त आहे. तरीही कॉंग्रेसचे नेते या घटनांबाबत उदासीन आहेत.

Leave a Comment