‘लालबागच्या राजा’ला मुंबई महापालिकेने ठोठावला ४.८ लाखांचा दंड


मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ४.८६ लाखांचा दंड ठोठावला असून पालिकेने हा दंड गणेशोत्सव काळात खोदलेले २०० खड्डे न बुजवल्यामुळे ठोठावला आहे. पालिकेने मागील वर्षीही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून साडेचार लाखांचा दंड वसूल केला होता.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून खोदकाम करुन रस्त्यांचे नुकसान केल्याबद्दल ४.८६ लाख रुपये दंड म्हणून आकारण्यात येणार असल्याची माहिती एफ-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटेंनी दिली. मंडळाकडून लालबागच्या राजाचा मंडप घालण्यासाठी आणि दर्शनाची रांग तयार करण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. पण हे खड्डे गणेशोत्सवानंतरही न बुजवल्यामुळेच मंडळाकडून दंड आकारण्यात येणार असल्याचे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे. मंडळांकडून उभारण्यात आलेल्या मंडपांमुळे रस्त्यांचे नेमके किती नुकसान झाले आहे, याचा आढावा घेतला जात असून त्यांच्याकडून दंड आकारण्याआधीच आठवड्याभरात सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल, असे एफ-दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

दुसरीकडे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी अद्याप आम्हाला पालिकेची नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले. रस्त्याचे आमच्या मंडपामुळे नुकसान झाले असल्यास आम्ही दंडाची रक्कम भरु. पण यावेळी आम्ही रस्त्याचे नुकसान होऊ नये, यासाठी अधिक काळजी घेतली होती. याशिवाय मंडपासाठी खोदण्यात आलेले खड्डेदेखील आम्ही भरले होते. त्यामुळे आमच्यामुळे २०० खड्डे पडणे अशक्य वाटते. लालबागच्या राजाच्या दर्शनाला मोठी रांग असते. त्यामुळे या भागातील बरेचसे खड्डे आमच्यामुळेच पडले असावेत, असा पालिकेचा समज झाला असावा, असेही त्यांनी म्हटले.