शाळेतील ‘यस सर/यस मॅडम’ची जागा घेणार जय हिंद!


नवी दिल्ली – मध्य प्रदेश सरकारने शाळेतील मुलांनी हजेरी देताना यस सर किंवा यस मॅडमऐवजी जय हिंद म्हणावे, असा नवा आदेश काढला असून हा आदेश एक ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. सुरुवातीच्या काळात हा आदेश सतना जिल्ह्यात लागू होईल. राज्यातील इतर जिल्ह्यांमधील शाळांमध्येही त्यानंतर या आदेशाचे पालन केले जाईल असे मध्य प्रदेश सरकारचे शिक्षण मंत्री कुंवर विजय शाह यांनी म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना शाळेत हजेरीवेळी यस मॅडम/यस सर बोलतात त्याऐवजी त्यांनी जय हिंद बोलावे. जर का हा प्रयोग सतनामध्ये यशस्वी झाला तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या परवानगीने संपूर्ण राज्यात याबद्दलचा आदेश लागू केला जाईल. या आदेशाची सतनामधील खासगी शाळांमध्ये जबरदस्तीने अंमलबजावणी केली जाणार नाही. पण देशभक्तीशी संबंधित हा आदेश असल्याने खासगी शाळादेखील त्याची अंमलबजावणी करतील, अशी आशा कुवंत विजय शाह यांनी व्यक्त केली आहे.

देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी नवा आदेश लागू करण्यात आल्याचे सांगण्यात येते. पण लवकरच मध्य प्रदेशमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा आदेश काढण्यात आल्याची चर्चा सध्या मध्य प्रदेशमध्ये सुरु आहे.