Skip links

८६ वर्षांनंतर भगतसिंह यांना न्याय मिळवून देणार पाकिस्तानी वकील


लाहोर – भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक भगतसिंह यांना ८६ वर्षांनंतर न्याय मिळवून देण्यासाठी पाकिस्तानातील एक वकील न्यायालयात लढा देणार असून ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याच्या आरोपात दोषी ठरवत भगतसिंह यांना फाशी देण्यात आली होती. त्यांनी हत्या केलीच नव्हती आणि ते निर्दोष होते असा दावा एका पाकिस्तानी वकिलाने केला असून त्याने यासंदर्भात सोमवारी न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली आहे.

या पाकिस्तानी वकिलाचे नाव अॅड. इम्तियाज रशीद कुरेशी असे असून सध्या लाहोरमधील भगतसिंह मेमोरिअल फाऊंडेशन अॅड. कुरेशी हे चालवतात. सोमवारी लाहोर उच्च न्यायालयात भगतसिंह यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कुरेशी यांनी नव्याने याचिका दाखल केली आहे. त्यांनी यासंदर्भात गेल्या वर्षीही याचिका दाखल केली होती. पण त्यावर अद्याप काहीही कार्यवाही झाली नव्हती. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यांत पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांना लाहोर उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने विनंती करीत अॅड. कुरेशी यांच्या याचिकेवर सुनावणीसाठी खंडपीठातील न्यायाधीशांची संख्या वाढवावी अशी विनंती केली होती.

भारताचे तुकडे होऊ नये यासाठी भगतसिंह लढत होते, असे अॅड. कुरेशी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. भगतसिंह यांची या आरोपातून सरकारचे पुनरावलोकन आणि सुव्यवस्थेचे सिद्धांत वापरून सुटका करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी आपल्या याचिकेत केली आहे. त्याचबरोबर भगतसिंह यांचा देशपातळीवरील पुरस्काराने गौरव करण्यात यावा, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

Web Title: Justice after 86 years? Pak lawyer battles to prove Bhagat Singh's innocence in Lahore court