आता एका आठवड्यातच मिळणार घटस्फोट!


नवी दिल्ली – परस्पर सामंजस्याने नवरा आणि बायको दोघेही एकामेकांपासून विभक्त होऊ इच्छित असल्यास त्यांना यापुढे सहा महिने घटस्फोट मिळण्यासाठी थांबण्याची गरज नाही. घटस्फोटाला दोघांचीही मान्यता असेल तर आठवड्यातच घटस्फोट दिला जाऊ शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पुढील काळात सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

एखाद्या जोडप्याला हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोट हवा असेल, तर त्यासाठी दोघांना अर्ज केल्यानंतर किमान सहा महिन्यांचा कालावधी दिला जातो. हा कालावधी समुपदेशनासाठी राखीव ठेवला जातो. पण घटस्फोटाचा निर्णय त्यानंतरही कायम राहिल्यास संबंधित जोडप्याच्या घटस्फोटाला कायदेशीरपणे मंजुरी दिली जाते.

पण काल सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या निकालात म्हटले आहे की, जर घटस्फोटाचा अर्ज करण्याआधीही एखादे जोडपे वर्षभरापासून विभक्तपणे राहत असेल, त्याचबरोबर घटस्फोट घेण्याला नवरा आणि बायको या दोघांचीही मंजुरी असेल, तसेच अपत्याचे पालकत्व कोणाकडे असेल, दोघांमध्ये यावरही सहमती असेल, तर अशा स्थितीत सहा महिन्यांच्या कालावधीची अट शिथिल केली जाऊ शकते. एका आठवड्यातच अशा जोडप्याला घटस्फोट दिला जाऊ शकतो. त्यामुळे पुढील औपचारिकतांची पूर्तताही लवकर केली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.