मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांना धमकी


मुंबई – निनावी फोनद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांना धमकी देण्यात आल्यामुळे न्यायालय परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धमकीचा फोन दहशतवादविरोधी पथकाला करण्यात आला होता. मुख्य न्यायमूर्तींच्या चेंबर बाजूच्या रुममध्ये बॉम्ब ठेवला असून थोड्याच वेळात स्फोट घडवला जाईल, अशी धमकी देण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनंतर उच्च न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली.

शिवाय न्यायमूर्तींच्या दालनात बॉम्ब शोध पथक, श्वान पथक तिथे दाखल झाल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील मंजुला चेल्लूर यांच्या कोर्टरुमसह शेजारील खोलीचीही तपासणी केली. परंतु तपासणीत बॉम्ब किंवा बॉम्बसदृश्य कोणतीही वस्तू सापडली नाही. पण पूर्ण तपासणीनंतर मंजुला चेल्लूर यांना कोर्टरुममध्ये पाठवले जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, ही धमकी कोणी दिली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पण हा फेक कॉल असल्याचे स्पष्ट झाले आहे.