मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे चंद्रकांत पाटील अध्यक्ष


मुंबई – राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली असून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे गिरीश महाजन आणि संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या ५ सदस्यीय उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या उपसमितीचे अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे असणार आहेत. ही समिती मराठा आरक्षणाबाबत समन्वय ठेवण्यासाठी संबंधित घटकांशी चर्चा करणार आहे.

मुंबईमध्ये मराठी समाजाने ९ ऑगस्ट रोजी विराट मूक मोर्चा काढला होता. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर या मोर्चाचा समारोप झाला होता. मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमून दर तीन महिन्याला समन्वय ठेवण्यासाठी चर्चा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले होते. मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादा देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मराठा मोर्चावेळी म्हटले होते.