अॅपलचे बहुप्रतिक्षित आयफोन एक्स, आयफोन ८ व आयफोन ८ प्लस लाँच


कॅलिफोर्निया – बहुप्रतीक्षित आयफोन एक्स, आयफोन ८ व आयफोन ८ प्लसची सीरिज मोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या अॅपलने लाँच केली आहे. या फोनची जगभरातील मोबाईल प्रेमींना प्रतीक्षा होती. सीईओ टीम कूक यांनी याची घोषणा क्यूपार्टिनो येथील अॅपलच्या कॅम्पसमध्ये केली. स्टीव्ह जॉब्स यांचा संदेश वाचून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.

या सोहळ्यावर जगभरातील तंत्रज्ञानप्रेमींच्या नजरा खिळल्या होत्या. या सोहळ्याचे अॅपलच्या वेबसाईटवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. आयफोनसोबत अॅपल वॉच सीरिज ३ आणि अॅपल ४ के टीव्हीही लाँच केला. सध्यातरी हे दोन्ही प्रॉडक्ट भारतात उपलब्ध होणार नाहीत.

नव्या अॅपल आयफोन एक्सची किंमत ९९९ डॉलर, आयफोन ८ ची किंमत ६९९ डॉलर तर आयफोन ८ प्लस ७९९ डॉलर ठेवण्यात आली आहे. हा फोन ३ नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. तर यात इन्फ्रारेड कॅमेरा देण्यात आला आहे. जो अंधारातही युजरचा चेहरा डिटेक्ट करू शकतो. यात १२ मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. अॅपल आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हा ६४ जीबी, २५६ जीबीमध्ये उपलब्ध असेल. तर सिल्वर, स्पेस ग्रे आणि गोल्ड या तीन रंगात मोबाइल मिळणार आहे.

अॅपल ४ के टीव्हीमध्ये आतापर्यंतची सर्वांत उत्तम पिक्चर क्वॉलिटी असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. हा टीव्ही तूर्तास भारतात मिळणार नाही. सध्या या अ‍ॅपल टीव्हीची किंमत १४९ डॉलर एवढी ठेवण्यात आली आहे. भारतीय रूपयाची तुलना केली तर केवळ साडेनऊ हजार रुपयांना आहे. हा टीव्ही सध्या भारतात उपलब्ध होणार नसला तरी अमेरिकेत तो २२ सप्टेंबरपासून मिळेल.

या टीव्हीची वैशिष्ट्य ?
– एचडीआर टेन आणि डॉल्बी व्हिजन क्षमता असेल.
– साध्या एचडी टीव्हीपेक्षा चार हजार पट पिक्सेल्स असलेला हा टीव्ही असेल.
– नेटफ्लिक्सवरील चार हजार पिक्चर पाहता येतील.
– अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडोओ यावर वर चालेल.
– तुमच्याकडे जर आयपॅड किंवा आयफोन असेल तर तुमच्यासाठी अ‍ॅपल टीव्ही हा एक उत्तम पर्याय असेल.
– याच कार्यक्रमात लाँच करण्यात आलेला स्काय नावाचा व्हिडीओ गेमही या टीव्हीवर खेळता येणार आहे. हा गेम आठ प्लेअर कोठेही बसून खेळू शकतात.